रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिक्षकांसाठी ठरली तारक संजीवनी

पगारदार विमा योजनेअंतर्गत प्रत्येकी १५ लाखांचा मदतनिधी सुपूर्द

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने बँकेच्या महाड आणि चिरनेर या शाखेमध्ये खाते असलेल्या शिक्षकांचे अपघाती निधन झाले असताना त्यांच्या कुटुंबीयांना बँकेच्या वतीने दि न्यू इंडिया इन्शुरन्सच्या सहकार्याने प्रत्येकी 15 लाखांचा धनादेश बँकेच्या केंद्र कार्यालयामध्ये बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप आपसुंदे तसेच दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या मुख्य क्षेत्रीय व्यवस्थापक अलका आगरकर, क्षेत्रीय व्यवस्थापक किशोर सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदर धनादेश जयश्री महेंद्र शिवभगत, चिरनेर आणि अभय विकास शिगवण, महाड यांनी आपल्या कुटुंबियाच्या अपघाती विमा योजनेअंतर्गत स्विकारला.

सामाजिक बांधिलकी मधून बँकेचा उपक्रम. या सर्व खातेधारकांच्या विमा प्रीमियमची रक्कम बँकेच्या वतीने देण्यात आली. आज अखेर बँकेने सतत तीन वर्षे विमा कंपनीला सदर योजनेचा प्रीमियम अदा केलेला असून, जिल्ह्यातील 5000 पेक्षा अधिक पगारदार खातेधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

आ. जयंत पाटील, चेअरमन, रायगड जिल्हा मध्य.सह.बँक

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने 2021 साली ज्या खातेधारकांचा पगार बँकेच्या शाखेमध्ये जमा होतो, त्यांच्याकरिता ऐच्छिक स्वरूपाची योजना दि न्यू इंडिया इन्शुरन्सच्या द्वारे सुरू करण्यात आली. या योजनेनुसार पगारदार खातेदार यांच्याकरिता 15 लाखांचा अपघाती विमा देण्यात आला आहे. बँकेच्या या अभिनव योजनेला जिल्ह्यातून पहिल्याच वर्षी चांगला प्रतिसाद लाभून तब्बल 3,388 खातेधारकांनी या योजनेमध्ये सहभाग घेतला. यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी, जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे शिक्षक यांची संख्या अधिक प्रमाणात होती.

यावेळी नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप आपसुंदे यांनी देखील बँकेचे कौतुक केले आणि सदर योजना अधिक व्यापक व्हावी आणि अधिकाधिक पगारदार खातेदारांनी याचा लाभ घ्यावा याकरिता आमच्या वतीने देखील आवाहन करण्यात येईल, असे बँकेला आश्वसीत केले. तसेच दिवाळी सणाच्या वेळी देखील बँकेने शिक्षकांचा पगार उशिरा आल्याने त्यांना वेळीच अ‍ॅडव्हान्स उपलब्ध करून दिला होता, याचाही उल्लेख करत बँकेच्या या कृतीचे प्रदीप आपसुंदे यांनी बँकेचे अभिनंदन केले.

बँकेच्या या सहकार्यामुळे आम्हाला आमच्या आर्थिक गरजा भागविण्याकरिता मदत होणार असून याबाबत आम्ही बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील, बँकेचे सर्व संचालक आणि बँकेचे अधिकारी यांचे आभार मानतो, असे मत जयश्री शिवभगत आणि अभय शिगवण या लाभर्थ्यांनी व्यक्त केले. सदर योजना ऐच्छिक स्वरूपाची असली तरी जिल्ह्यातील अधिकाधिक पगारदार खातेधारकांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी केले. तसेच दि न्यू इंडिया इन्शुरन्सच्या वतीने देखील विशेषत: वरिष्ठ विभागीय अधिकारी किशोर पाटील आणि तसेच दि न्यू इंडिया इन्शुरन्सचे अधिकारी श्रीकांत शिंदे यांचे सदैव सहकार्य लाभते, असे नमूद करून विमा कंपनीचे आभार व्यक्त केले.

Exit mobile version