रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 5000 कोटीच्या व्यवसायाकडे वाटचाल

। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी (आरडीसीसी) बँकेने 30 जून 2022 अखेर जाहीर केलेल्या तिमाहीत आपला व्यवसाय 4100 कोटींच्या पुढे नेला आहे. तसेच येत्या आर्थिक वर्षात 5000 कोटींचे उद्दिष्ट बँकेच्या वतीने पूर्ण करण्यात बँक नक्कीच यशस्वी होईल. याबाबत बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या संचालक मंडळ सभेमध्ये त्यांनी आपले मत व्यक्त केले,.तसेच बँकेचे अध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बँकेची प्रगती ही सर्वोत्तम होत असून संचालक म्हणून आम्हा सर्वांना बँकेचा आणि बँकेच्या नेतृत्वाचा अभिमान आहे असेही मतही सुरेश खैरे यांनी व्यक्त केले.

नावातील साधर्म्यामुळे संभ्रम
आज काही वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांच्या डीजीटल आवृत्तीमध्ये रायगड बँकेवर आरबीआयचे निर्बंध या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. सदर रायगड बँक ही मुंबईस्थित अर्बन सहकारी बँक असून याबाबत ऑनलाईन वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या यांनी दिलगिरी व्यक्त करून तात्काळ सुधारणा केली. या बातमीशी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.अलिबाग (आरडीसीसी बँक) चा कोणताही संबध नाही. केवळ रायगड या नावातील साधर्म्यामुळे आरडीसीसी बँकेच्या ग्राहकांनी व ठेवीदारांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये, असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जून 2022 अखेर रु.2601 कोटींच्या ठेवी तर रु.1520 कोटींची कर्जे वितरीत केलेली असून बँकेने मार्च 2022 अखेर शून्य टक्के एनपीए राखला आहे. बँकेच्या सांपत्तिक स्थितीमध्ये मार्च 2022 पेक्षा या तिमाहीत देखील समाधानकारक वाढ झालेली असून बँकेने यापुढे आपले लक्ष अधिक आधुनिक सेवा देण्यावर भर दिला जाणार असल्याचेही मत सुरेश खैरे यांनी व्यक्त केले.

आ. जयंत पाटील यांनी सदैव आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिलेले असून रायगड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या संकल्पनेतून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली बँकेच्या माध्यमातून लवकरच एक नवीन सुविधा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावागावातील ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार पाणीपट्टी आणि घरपट्टी थेट बँकेच्या खात्यामध्ये जमा करता येणार आहे. ही योजना अंतिम टप्यात असून लवकरच या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. रायगड जिल्हा सहकारी बँकेने आजवर सहकार क्षेत्रामध्ये केवळ राज्यातच नव्हे तर देशात अतिशय चांगले नाव संपादन केलेले असून यापुढील काळात बँकेच्या धोरणामध्ये अधिक गतिमानता, आधुनिकता आणि पारदर्शकता येण्यासाठी बँकेच्या कर्मचार्‍यांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय बँकेने मागील 15 वर्षापेक्षा अधिक काळ अ ऑडीट वर्ग संपादन केलेला असून नाबार्ड परीक्षणामध्ये देखील अव्वल गुण संपादन केलेले आहेत.

बँकेच्या प्रगतीमध्ये बँकेच्या ग्राहकांनी बँकेवर दाखविलेल्या विश्‍वासामुळे बँकेला ही प्रगती साध्य करता आली. त्यामुळे ग्राहकांचे आभार देखील सर्व संचालकांच्या वतीने व्यक्त करण्यात आले. या वर्षी देखील बँकेच्या प्रगतीमध्ये हे सातत्य बँकेने राखावे, याकरिता बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना संचालक मंडळाच्या वतीने सदैव मार्गदर्शन आणि सहकार्य उपलब्ध असेल, असेही बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांनी सांगितले.

Exit mobile version