आरोग्य सेविका न्यायाच्या प्रतिक्षेत

| अलिबाग | प्रतिनिधी |

गेल्या 15 दिवसांपासून कंत्राटी आरोग्य सेविका व आरोग्य समुदाय अधिकारी यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते आंदोलनाला बसले आहेत. मात्र अजूनही सरकारने कोणतीही भुमिका घेतली नसल्याने या सेविका न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.

महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनच्या वतीने हा लढा सुरु आहे. त्याची सुरुवात 25 ऑक्टोबरपासून झाली आहे. रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या आरोग्य केंद्र व उपकेंद्रात सेवा देणाऱ्या आरोग्य सेविका व आरोग्य समुदाय अधिकारी गेल्या अनेक वर्षापासून कंत्राटी स्वरुपात काम करीत आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी ही मंडळी रात्रंदिवस सेवा देत आहेत. गावे, वाड्यांमधील रुग्णांची तपासणी करणे, त्यांना आरोग्य सेवा पुरविणे. लहान मुलांचे लसीकरण करणे, आरोग्यविषयक योजनांचा लाभ तळागळातील घटकांपर्यंत पोहचविणे अशी अनेक कामे हे कर्मचारी करीत आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान( एनएचएम ) अंतर्गत शहरी, ग्रामीण व एनयुएचएम अंतर्गत कार्यरत तसेच एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना वयाची अट शिथील करावी, तसेच नियमित रिक्त पदावर समायोजन करण्यासाठी धोरणात्मक निर्णय त्वरित घेण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी अनेक वेळा लढे आंदोलने दिले आहेत. सरकारकडून फक्त आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी 25 ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात सुचिता पाटील, हेमलता पांडव, श्यामल साळुंखे, वैशाली नरवडे, मानसी कार्लेकर, डॉ. रुपेश सोनावळे, डॉ. राहुल थोरात यांच्यासह असंख्य कर्मचारी सामील झाले आहेत. पंधरा दिवस उलटून गेले आहेत. तरीदेखील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका घेतली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरु ठेवला आहे. याबाबत जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांच्याशी संपर्क साधला असता, होऊ शकला नाही.

मागणी पुर्ण व्हावी, यासाठी आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. लेखी स्वरुपात जोपर्यंत आश्वासन दिले जात नाही. तोपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे.

कृपाली पाटील, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन रायगड जिल्हा
Exit mobile version