| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा क्षयमुक्त करण्यासाठी गतवर्षी मोठी मोहीम उभारली गेली होती. या मोहिमेतून अतिजोखमीच्या ग्रामपंचायतींमधील 3 लाख 36 हजार 271 नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यातून शोधल्या गेलेल्या रुग्णांवर प्राधान्याने उपचार करण्यात आले होते. तरीदेखील रायगड जिल्ह्यात दीड हजार क्षयरुग्ण आढळले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात मोहीम राबवूनही अद्याप जिल्ह्याला क्षयरोगमुक्ती मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत सक्रिय क्षयरुग्ण निर्मूलन मोहीम अभियान गतवर्षी 3 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत अतिजोखमीच्या भागात राबविण्यात आली होती. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील एकूण 16 क्षयरोग पथकांतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय स्तरावर आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक, क्षेत्रिय कर्मचारी व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. या पथकांनी घरोघरी जाऊन भेटी जनजागृती करीत मार्गदर्शन केले. निदान झालेल्या क्षयरुग्णांना केंद्र सरकारमार्फत उपचार सुरू असेपर्यंत दरमहा 500 रुपये निक्षय पोषण योजनेंतर्गत पोषण आहारासाठी देण्यास सुरुवात केली होती. योजनेस तळा, म्हसळा, श्रीवर्धन, अलिबाग येथे चांगल्या प्रकारे यश आले; मात्र, त्याच वेळेस खालापूर, उरण, पनवेल या तालुक्यात अद्यापही क्षयरुग्ण सापडत आहेत.
या मोहिमेंतर्गत आतापर्यंत 6 लाख 13 हजार 609 लोकसंख्येची तपासणी पथकाद्वारे करण्यात आली आहे. त्यात लक्षणे असलेल्या रुग्णांची शासकीय दवाखान्यांत आरोग्य तपासणी करून निदान झालेल्या क्षयरुग्णांना त्वरित मोफत औषधोपचार करण्यात आले आहे.
जिल्ह्यात क्षयरोगमुक्त कार्यक्रम राबवण्यासाठी 75 गावे निवडण्यात आली होती. मोहिमेत काम करणाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला होता. त्याचप्रमाणे क्षयरोग निर्मूलनासाठी प्रयत्न करणारे व क्षयरोगमुक्तीसाठी क्षयरुग्णांना दत्तक घेणारे निक्षय मित्र तसेच क्षयरोगाला हरवून क्षयरोगमुक्त रुग्ण (टीबी चॅम्पियन्स) यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. त्यात निक्षय मित्र डॉ. कृष्णा देसाई, सागर काटे याच्यासह संस्थाचे प्रतिनिधी आणि टीबी चॅम्पियन्स संजय पोईनकर, विद्या मगर, वैभव म्हात्रे, योगेश गावंड यांचा सत्कार करण्यात आला होता.
रुग्ण तपासणीचे उद्दिष्ट | 5,15,472 |
तपासणी झालेले रुग्ण | 6,13,609 |
एकूण टक्केवारी | 119 % |
निक्षय शिबीर | 428 |
काढलेले एक्स-रे | 37,527 |
मायस्क्रोपी केलेले रुग्ण | 11,955 |
नॅट तपासणीतील रुग्ण | 10,040 |
मोहिमेत सापडलेले रुग्ण | 1462 |
विद्यमान रुग्ण | 1588 |