एकाच दिवशी 778 ठिकाणी वनराई बंधारे उभारणी
| रायगड | प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची संपूर्ण रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी बुधवारी (दि.7) या एकाच दिवशी श्रमदान कार्यक्रम राबवून 778 ठिकाणी वनराई बंधारे बांधण्यात आले. यामुळे ग्रामपंचायती जलसमृ़द्ध होण्यास मदत होणार असून त्यांची पाण्याची समस्या दूर होणार आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत हा विशेष उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढवणे, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारणे तसेच ग्रामीण भागात जलसंधारणास चालना देणे हा आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधी, अधिकारी व ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
यानिमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भासले, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी महाड व पोलादपूर तालुक्यात बांधण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्याचप्रमाणे येथील विविध ग्रामपंचायतींना भेट देत समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेउन ग्रामस्थांशी संवाद साधला.
मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत) , सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची मुदत शासनाने वाढविली असल्याने रायगड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी अशाच उत्स्फूर्तपणे व नियोजनबद्ध पद्धतीने उर्वरित कामे पूर्ण करावीत असे आवाहन केले.
| तालुका | ग्रामपंचायतींची संख्या | वनराई बंधाऱ्यांची संख्या |
| अलिबाग | 62 | 62 |
| कर्जत | 55 | 59 |
| खालूापर | 45 | 44 |
| महाड | 134 | 83 |
| माणगाव | 74 | 57 |
| म्हसळा | 39 | 39 |
| मुरूड | 24 | 50 |
| पनवेल | 71 | 70 |
| पेण | 65 | 72 |
| पोलादपूर | 42 | 33 |
| रोहा | 64 | 61 |
| श्रीवर्धन | 43 | 39 |
| सुधागड | 33 | 36 |
| तळा | 25 | 39 |
| उरण | 35 | 4 |
| एकूण ग्रामपंचायती: | 811 | |
| एकूण वनराई बंधा-यांची संख्या: | 778 |







