सुशासन निर्देशंकात रायगड जिल्हा राज्यात पहिला

मुख्यमंत्र्याच्या हस्ते राज्याच्या सुशासन अहवालाचे प्रकाशन

| रायगड | वार्ताहर |

महाराष्ट्र जिल्हा सुशासन निर्देशांक 2023 मध्ये रायगड जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करून सुशासन निर्देशकांत राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याच्या 2023-24 वर्षाच्या सुशासन अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा सुशासन निर्देशांकाच्या संकेतस्थळाचे आणि सुशासन अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत जिल्ह्यातील महसूल विभागासह सर्व विभागांचा महत्वपूर्ण सहभाग आहे. या उत्कृष्ट कामगिरीसाठी विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर आणि जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.

शासन आणि जनता यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी असे उपक्रम महत्वाचे आहेत. शासन आपल्या दारी सारख्या उपक्रमातून सरकार थेट जनतेपर्यंत आपण नेत आहोत. कोट्यवधी लोकांना शासकीय योजनांचे लाभ आपण याद्वारे दिले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

शासनाच्या या महत्वाकांक्षी उपक्रमाला बळ देणारी या निर्देशांकांची संकल्पना आहे. यातील 10 क्षेत्राच्या गुणांकनात प्रत्येक जिल्ह्याने चांगली कामगिरी केल्यास सर्वसामान्यापर्यंत शासकीय योजनाचा लाभ प्रभावीपणे पोहचण्यास मदत होणार आहे. याचा विचार करुन सर्व जिल्हाधिकार्‍यांनी आपला जिल्हा सुशासन निर्देशांकात अग्रेसर कसा राहील यासाठी काम करावे. यातूनच जनतेच्या मनात हे आपले सरकार आहे, असा विश्‍वास निर्माण होण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सुशासन अहवालाचे सादरीकरण करतांना अपर मुख्य सचिव सौनिक यांनी सांगितले की, प्रशासन अधिक गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी मंत्रालय स्तरावर ई-ऑफिस आणि मध्यवर्ती टपाल कक्ष यासारखे उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर देखील सुशासन या संकल्पनेनुसार काम होण्यासाठी विविध 10 क्षेत्रांच्या कामगिरीच्या आधारावर प्रत्येक जिल्ह्याचे या निर्देशांकाचे आधारे मूल्यमापन करण्यात येत आहे. देशात जिल्हा सुशासन निर्देशांक ही संकल्पना राबविणारा महाराष्ट्र देशातील पाचवे राज्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, केंद्रीय कार्मिक मंत्रालयाचे सहसचिव एनबीएस राजपूत यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि सुशासन समितीचे पदाधिकारी यांच्यासह इतर मान्यवर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Exit mobile version