। रायगड । क्रीडा प्रतिनिधी ।
महाराष्ट्र क्रिकेट असो.च्यावतीने आयोजित करण्यात येणार्या खुल्या गटातील आंतरजिल्हा निवड चाचणी टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी रविवारी (दि.29) रायगड जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला आहे. यात पेण स्पोर्ट्स असो.चा अष्टपैलू खेळाडू सिद्धांत म्हात्रेची कर्णधार म्हणून, तर अलिबाग क्रिकेट अकॅडमी संघाचा तंत्रशुद्ध फलंदाज ऋषिकेश राऊत याची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा क्रिकेट असो.ने जाहीर केलेल्या संघात सिद्धांत म्हात्रे (कर्णधार), हृषिकेश राऊत (उपकर्णधार), श्रेयस कुमार, ओम जाधव (यष्टीरक्षक), देवांश तांडेल, समीर आवास्कर, प्रतीत गोटसुर्वे (यष्टीरक्षक), चैतन्य पाटील, संतोष गोस्वामी, ओंकार महाडिक, मिहिर भाटकर, तेजस मोहिते, कौस्तुभ म्हात्रे, नसीब नाईक यांना स्थान मिळाले आहे. तर, राखीव खेळाडू म्हणून अभिषेक खातू, साई साखरकर, तहा चिचकर, कौस्तुभ चौधरी आणि पश्चिम विभागासाठी प्रतिक म्हात्रे, रितेश तिवारी, संकेत गोवारी, अभिषेक जैन, अभिषेक नाईक यांची वर्णी लागली आहे. यावेळी, आरडीसीए तर्फे संघ निवडकर्ता म्हणून महाराष्ट्राचा माजी रणजीपटू पुष्कराज चव्हाण, योगेश पवार, उदय गद्रे, मैल्कम मोंटेरो यांनी काम पाहिले आहे. तर, मुख्य प्रशिक्षक म्हणून शंकर दळवी, संघ प्रशिक्षक म्हणून रवी सोलंकी व संघ व्यवस्थापक म्हणून सागर मुळे हे काम पाहणार आहेत.
जाहीर झालेला संघ पहिल्या दोन सामन्यासाठी असणार असून मंगळवार दि. 31 डिसेंबरपासून एमसीएच्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेत रायगडच्या संघाला पाच टी-20 क्रिकेट सामने खेळायचे आहेत. तसेच, रायगडच्या संघाला आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील सचिव प्रदिप नाईक, सर्व पदाधिकारी व सदस्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.