सीसीटीएनएस कार्यप्रणालीत रायगड जिल्हा अव्वल

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सीसीटीएनएस (क्राईम अ‍ॅन्ड क्रिमिनल ट्रॅकींग नेटवर्क सिस्टीम) कार्यप्रणाली मध्ये रायगड जिल्हयाने राज्यात 242 गुणांपैकी 237 गुण प्राप्त करून 98 टक्के गुणांसह मे महिन्याच्या गुणांकनात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. पोलीस ठाण्यात दाखल होणार गुन्हे, अटक होणारे गुन्हेगार यांच्यावर अंकुश ठेवण्याकरीता विविध उपाय योजना करण्यात येतात त्यामध्ये तंत्रज्ञानाचाही वापर होतो. सीसीटीएनएस हा पोलीस दलातील महत्वकांक्षी प्रकल्प असुन सर्व राज्यांमध्ये सदर प्रणालीचे कामकाज सुरू आहे. ऑन-लाईन कार्यप्रणालीमुळे सर्व पोलीस ठाणे एकत्र जोडले गेले आहेत. पोलीस ठाणेतील बहुतांश कागदोपत्री कामकाज बंद झाले असुन सर्व नोंदी व प्रक्रिया हया ऑन-लाईन घेतल्या जातात. पोलीस ठाणेस अटक होणा-या गुन्हेगारांच्या नोंदी सदरच्या प्रणालीत होत असल्यामुळे, कोणत्याही पोलीस ठाणेस कुठल्याही गुन्हेगाराचे नाव सदर प्रणालीत टाकल्यानंतर सदर आरोपीवर यापुर्वी किती गुन्हे दाखल आहेत याची इतंभुत माहिती प्राप्त होते. त्यामुळे गुन्हे आणि गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात सदर प्रणाली अत्यंत प्रभावी ठरत आहे.

मागिल काही महिन्यात सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये रायगड जिल्हा सातत्याने चांगली कामगिरी करीत आला आहे. सदर प्रणालीचा वापर करून केलेल्या चांगल्या कामगिरी मध्ये गुन्हे उघड करणे, वाहनांची तपासणी, गुन्हेगारांचा पुर्वइतिहास, प्रतिबंधक कारवाई, सिटीझन पोर्टल इ. मध्ये उत्तम कामगिरी दाखवित 242 गुणांपैकी 237 गुणांची कमाई करीत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक अशोक दुधे व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक, कार्यालय येथे स्थापीत सीसीटीएनएस कक्ष व पोलीस ठाणेस नियुक्त प्रशिक्षीत पोलीस अंमलदार यांनी ही प्रशंसनिय कामगिरी केली आहे.

मागिल काही महिन्यामध्ये रायगड जिल्हा पोलीस दलाने सीसीटीएनएस प्रणालीमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. पोलीस ठाण्यातील कामकाजामध्ये सदर प्रणालीचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करून यापुढेही हे सातत्य कायम राखले जाईल.

अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक रायगड

सीसीटीएनएस पोलीस विभागाचा एक महत्वकांक्षी प्रकल्प आहे.गुन्हयांची ऑन-लाईन नोंदणी, अन्वेषण, गुन्हेगारांवरील पुर्व इतिहास, प्रतिबंधक कारवाई, ऑन-लाईन पोर्टलचा उपयोग याव्दारे कमी वेळात अधिकाधिक माहिती उपलब्ध करून अन्वेषणामध्ये त्याचा उपयोग करणे इत्यादी विविध कामकाजामध्ये रायगड जिल्हयाने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. पुढेही सातत्य कायम ठेवत गुन्हयांना आळा बसावा व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा याकरीता प्रयत्नशिल राहणार.

अशोक दुधे, पोलीस अधीक्षक रायगड
Exit mobile version