14 सुवर्ण, 3 रौप्य, 4 कांस्यपदकांची कमाई
| रसायनी | वार्ताहर |
जिल्हा क्रीडा संकुल, अहमदनगर येथे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजित ‘महाराष्ट्र राज्य पुमसे तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा 2022-23’ उत्साहात पार पडली. नवी मुंबई व रायगडच्या खेळाडूंनी 21 विविध गटांमध्ये रायगड जिल्ह्यातर्फे सहभाग घेतला होता. यामध्ये 14 सुवर्ण, 3 रौप्य व 4 कांस्य पदकांसह एकूण 21 पदके मिळवून 1931 गुणांसह सांघिक विजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध वयोगटातील सुमारे 240 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पुमसे स्पर्धेमध्ये सब-जुनिअर, कॅडेट, जुनियर व सीनियर अशा विविध वयोगटातील वैयक्तिक पुरुष व महिला, मिश्र जोडी तसेच सांघिक पुरुष व महिला असे एकूण 33 गट असतात.
दरम्यान, स्वराली माटेकर हिने सब-जुनिअर वैयक्तिक मुली गटामध्ये सुवर्णपदक पटकावून स्पर्धेची सुरुवात केली, तर अमोल माळी यांनी 40 वर्षाखालील वैयक्तिक पुरुष गटामध्ये सुवर्णपदक घेऊन स्पर्धेची सांगता केली. या स्पर्धेत रोहित सिनलकर व प्रथम ठोंबरे यांनी प्रशिक्षक म्हणून, तर हुसेन शेख व निखिल ठुबे यांनी व्यवस्थापक म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. यातील सुवर्णपदक विजेते खेळाडूंची अधिकृत राष्ट्रीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली असून, या स्पर्धेतून भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे.
प्रशिक्षक रोहित सिनलकर यांची 19 ते 21 जानेवारीदरम्यान नमक्कल, तामिळनाडू येथे होणार्या राष्ट्रीय पुमसे तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा 2022-23 साठी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आहे.
सर्व खेळाडूंना राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक तुषार तानाजी सिनलकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. नवी मुंबई महानगरपालिका महापौर जयवंत सुतार तसेच पनवेल नगरसेविका दर्शना भोईर, नवी मुंबई मनपा विस्तार अधिकारी सुलभा बारघरे, मनपा मुख्याध्यापक मारुती गवळी, अमॅच्युअर तायक्वांदो असोसिएशन ऑफ रायगडच्या अध्यक्षा अॅड. प्रज्ञा भगत, सचिव सचिन माळी, उपाध्यक्ष संजय भोईर, खजिनदार रोहित सिनलकर इत्यादी मान्यवरांनी संघाचे अभिनंदन केले, तसेच विजेत्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.