बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
विकासाच्या नावाखाली होणारी झाडांची कत्तल, वाढते औद्योगिकरण व सिमेंटच्या जंगलामुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्याला येलो अलर्टचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बुधवारी 32 ते 37 अंश सेल्सिअस इतके तापमान वाढण्याची भिती आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. उन्हात जास्त फिरू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
पालघर, ठाणे व मुंबईत मंगळवारी रेड अलर्टचा इशारा दिला. त्यामुळे दिवसभर या भागातील नागरिकांना कडक उन्हाचे चटके जाणवत होते. त्यानंतर पालघर, ठाणे व मुंबईसह रायगड जिल्ह्यात बुधवारी येलो अलर्टचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी शेतावरील कामे सकाळी दहावाजेपर्यंत आटोपून घ्यावी. सतत पाणी प्यावे अशा सुचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट निर्माण होत असताना आता वाढत्या तापमानाचे संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यात आता उष्णता वाढली आहे. उन्हाचे चटके अधिक तीव्र होऊ लागले आहेत. सतत हवामानात बदल होत आहे. उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला. मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच तापमान वाढत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहिल. उन्ह वाढत असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. शक्यतो दुपारच्या वेळी घराच्या बाहेर पडणे टाळा, असे सांगितले जात आहे.







