पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना धक्का;
नारायण राणेंना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची तयारी
। रायगड । खास प्रतिनिधी ।
काँग्रेसमधून बाहेर पडत अशोक चव्हाण यांनी भाजपाच्या तंबूत प्रवेश केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे, तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी भाजपाने केली आहे. त्यामुळे रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचा पत्ता कापला गेल्याचे बोलले जाते. रायगडपाठोपाठ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत भाजपाने शिंदे गटाला चांगलाच धोबीपछाड दिल्याचे त्यानिमित्ताने दिसून येते.
भाजपाने आधी शिवसेना फोडली, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे पाडले, असा आरोप विरोधकांनी वेळोवेळी केला आहे. त्यानंतर आता भाजपाने शिंदे गट आणि अजित पवार गटावर वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. रायगड लोकसभेवर हक्क सांगून विद्यमान खासदारांना घरी बसण्याचा सल्ला यातून दिल्याचे बोलले जाते. मात्र, अजित पवार गटाने रायगड लोकसभा मतदारसंघ आपल्याच पदरात पडावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. त्यातच आता राज्यसभेवर सुनील तटकरेंना पाठवण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. परंतु, यामधील तिढा लवकरच दूर होणार आहे.
अशोक चव्हाण यांना पक्षात घेतल्याने त्यांचे राजकीय पुनर्वसन करणे गरजेचे असल्याने चव्हाण यांना पाठीमागच्या दाराने राज्यसभेवर पाठवून त्यांची केंद्रात मंत्रीपदी वर्णी लावण्याची तयारी भाजपाने केल्याचे बोलले जाते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उतरवण्यात येणार असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले किरण सामंत यांचा पत्ता कट केल्याची चर्चा आहे. मध्यंतरी या लोकसभा मतदारसंघात किरण सामंत यांचे भावी खासदार असे शुभेच्छा फलक झळकले होते. राणे यांच्या उमेदवारीने त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचे दिसून येते.
दरम्यान, एकूणच भाजपाने आपले खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या शिंदे आणि अजित पवार गटाची चांगलीच कोंडी झाली आहे.
सामतांचा दावा लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अद्याप निश्चित झालेले नाही. नैसर्गिक न्यायानुसार मतदारसंघात ज्या पक्षाचा विद्यमान खासदार आहे, त्या ठिकाणी त्याच पक्षाच्या खासदाराचा दावा राहील, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. सामंत यांच्या या भूमिकेमुळे त्यांनी रायगड लोकसभेच्या विद्यमान खासदारांची बाजू घेतल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपामध्ये कमालीची धुसफूस सुरु असल्याचे दिसून येते.