कौटुंबिक सहलींचे प्रमाण अधिक; स्थानिकांना रोजगाराची संधी
| महाड | वार्ताहर |
सकाळी पसरलेली धुक्याची झालर, हवीहवीशी वाटणाऱ्या थंडीमुळे जिल्ह्यातील वातावरण सध्या पर्यटकांना भुरळ घालते आहे. दिवाळीची सुटी असल्याने रायगड किल्ल्यावर शिवप्रेमी व पर्यटकांचा ओघ वाढला आहे. यात आपल्या मुलाबाळांसह दाखल होणाऱ्या कौटुंबिक सहलींचे प्रमाण अधिक आहे. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे स्थानिकांनाही रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. रायगड किल्ल्यावर दिवाळीपासून पर्यटन हंगाम सुरू होतो. थंडीतील वातावरण आल्हाददायक झाल्याने सध्या शिवप्रेमींबरोबरच पर्यटकांची पावले किल्ल्याकडे वळली आहेत.
पावसाळ्यात दरड कोसळल्याने दोन महिने किल्ला पर्यटकांसाठी बंद होता. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांचे नुकसान झाले होते. सध्या पर्यटकांचा ओघ वाढल्याने उत्पन्नात वृद्धी होण्याची आशा व्यावसायिकांना आहे. दिवाळीची पहिली पहाट रायगडावर साजरी करणाऱ्या शिवप्रेमींची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज दोन ते तीन हजार पर्यटक सध्या रायगड किल्ल्यावर भेट देत आहेत. महाड, पाचाड व हिरकणीवाडी येथील निवासव्यवस्था पर्यटकांसाठी सज्ज झाल्या आहेत.
दिवाळीच्या सुट्टीत बच्चे कंपनीकडून किल्ले बनवले जातात. या गड-किल्ल्यांचा इतिहासाबाबत त्यांना कुतूहल असते. त्यामुळे पालकांकडूनही सुट्टीत गड-किल्ल्यांची सफर करण्याचा कल वाढत आहे. काही दिवसांपासून पुणे, मुंबई, नगर, सातारा, ठाणे, कल्याण या भागातील पर्यटक येत आहेत. पर्यटनाचा हा हंगाम मार्चपर्यंत राहील, अशी आशा स्थानिक व्यावसायिकांना आहे. रायगडाच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात पर्यटन कंपन्यांच्या बस व इतर वाहने उभी असल्याने स्थानिक व्यावसायिकांना चांगला रोजगार मिळत आहे.
दिवाळीची सुटी असल्याने कौटुंबिक सहलीला येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असल्याने निवास व्यवस्थेला मागणी आहे. रायगडावर रोप वे ने जाण्यात वेगळेच थ्रिल असल्याने व केवळ चारच मिनिटात गडावर जाता येत असल्याने हा अनुभवही पर्यटक घेत आहेत. सध्या धुके असल्याने ढगांतून जाण्याची मजा पर्यटक घेत आहेत. तर पायी गड चढणाऱ्याची संख्याही मोठी आहे.
गडाच्या पायथ्यापासून पर्यटकांची लगबग सुरू असल्याने हिरकणीवाडी, रायगड पायथा या ठिकाणी न्याहरी, भोजन तसेच घरगुती जेवणाचा व्यवसाय तेजीत आहे. रायगड रस्त्याचे रुंदीकरण होत असल्याने वाहतूक समस्याही दूर होणार असल्याने याचा फायदा पर्यटकांना मिळणार आहे.
प्रथमेश मंडलिक, पर्यटक, पुणे