युनेस्को पथकाने केली पाहणी
। रायगड । प्रतिनिधी ।
छत्रपती शिवाजी महाराजांनी साकारलेल्या हिंदवी स्वराज्यााची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडाचा समावेश प्रतिष्ठित जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्याच्या हालचाली अत्यंत वेगाने सुरु आहेत. यासाठी नामांकन मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून गुरुवारी(दि.9) युनेस्कोच्या शिष्टमंडळाने किल्ले रायगडाला भेट देवून पाहणी केली.
या पथकामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ञ हेवान्ग ली, सह संचालक जागतिक वारसा (एएसआय) मदन सिंग चौहान, महाराष्ट्र शासन पुरातत्व विभाग संचालक सुजित उगले, उपसंचालक हेमंत दळवी, डॉ शुभा मजुमदार यांचा समावेश होता. पथकाने कुशावर्त तलाव, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर, बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज समाधी, हत्तीखाना, भवानी मंदिर आणि टोक, टकमक टोक, या महत्त्वपूर्ण ठिकाणासह विविध ऐतिहासिक खुणांना भेट दिली. तसेच या पथकाने किल्ल्याचा इतिहास आणि सद्यस्थितीबद्दल तपशीलवार माहिती घेतली. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी किल्ल्यातील हवामान, वनस्पती आणि इतर संबंधित पर्यावरणीय घटकांवर चर्चा केली. तसेच या किल्ल्याच्या संवर्धनासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने घेतलेले निर्णय, सुरु असलेली कार्यवाही तसेच पर्यटन विकासासाठी केलेल्या उपाययोजना याबाबत माहिती घेतली. तसेच गडाच्या जतनामध्ये प्रशासन, स्थानिक नागरिकांच्या सहभागाविषयी माहिती दिली. युनेस्को टीमने देखभाल आणि संवर्धनासाठी संभाव्य सुधारणांबद्दल त्यांची मते मांडली. भेटीदरम्यान, शिष्टमंडळाने स्थानिक प्रतिनिधी आणि गावकर्यांशी देखील संवाद साधला. यावेळी रायगड किल्ला पाहण्यासाठी आलेल्या नवोदय विद्यालय निजामपूरच्या विद्यार्थ्यांशी देखील या पथकाने संवाद साधला.
यावेळी प्रांत डॉ ज्ञानोबा बाणापुरे, प्राधिकरणच्या सलोनी साळुंखे, शिखा जैन, पुरातत्व विभागाचे शेख, रायगड पुरातत्व विभागाचे दिवेकर, वरूण भामरे, तहसीलदार महेश शितोळे, रोप वे प्रतिनिधी राजेंद्र जोग, माजी सरपंच पाचाड राजेंद्र खातू, उपसरपंच संदीप ढवळे, गाव कमिटी सदस्य हिरकणीवाडी मनोहर अवकीवकर आदीनी चर्चेत सहभाग घेतला.
देशातील सहा किल्ले
जागतिक वारसा स्थळामध्ये भारतातील सहा किल्ल्यांचा समावेश आहे. यामध्ये चित्तोड किल्ला, कुंभलगड किल्ला, रणथंबोर किल्ला, गाग्रोन किल्ला, अंबर किल्ला, आणि जैसलमेर किल्ला अशी या किल्ल्यांची नावे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाशी जोडलेल्या 12 निवडक किल्ल्यांपैकी दुर्गराज रायगडाची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करण्याचे विचाराधीन आहे. या समावेशामुळे रायगड किल्ल्याला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळेल आणि जागतिक पर्यटक आकर्षित होतील, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा विश्वास जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यावेळी व्यक्त केला.







