संवर्धनासाठी डीपीडीसीतून 9 कोटी 90 लाख
| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यांतील गडकिल्ले, संरक्षित स्मारक संवर्धनासाठी तीन टक्के निधी जिल्हा वार्षिक योजनेतून दिला जाणार आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. संरक्षित स्मारकांच्या संवर्धनाचे प्रस्ताव तयार करण्यासाठी वास्तूचे पुरातत्वीय किंवा वास्तुशास्त्रीय महत्त्व, कालखंड, सद्यस्थिती, भेट देणारे पर्यटक, लोकप्रतिनिधी, स्थानिक, नागरिक यांची मागणी असे निकष निश्चित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील गड किल्ले , संरक्षित स्मारकांच्या संवर्धनासाठी जिल्हा नियोजनमधून नऊ कोटी 90 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
रायगड जिल्ह्यात विविध कालखंडातील वास्तू, गड किल्ले आणि स्मारके आहेत. या ऐतिहासिक, पुरातन स्मारकांपैकी 20 गडकिल्ले आणि स्मारके केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या संस्थेने राष्ट्रीय महत्त्वाची म्हणून संरक्षित केली आहेत. तर राज्याच्या पुरातत्त्व विभागातर्फे 30 गडकिल्ले आणि स्मारके संरक्षित म्हणून घोषित केली आहेत. संरक्षित स्मारकांच्या संवर्धनासाठी राज्यस्तरीय योजनेतील निधी तुटपुंजा असल्याने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2023-24 पासून पुढील तीन वर्षांसाठी तीन टक्के निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत संवर्धनाची कामे हाती घेण्यासाठी पुरातत्व विभागाच्या सहायक संचालकांना त्यांच्या अखत्यारितील जिल्ह्यांचा सविस्तर प्रस्ताव तयार करावा लागणार आहे. संवर्धनाच्या कामांमध्ये जतन संवर्धन, परीरक्षण, देखभाल दुरुस्ती, पर्यटकांसाठी सुविधा, सुशोभिकरण, रासायनिक जतन काम, माहितीफलक, दिशादर्शक फलक अशी कामे करता येणार आहेत. सहायक संचालकांच्या प्रस्तावाला पुरातत्त्व विभागाचे संचालक तांत्रिक मान्यता देणार आहेत , त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता दिली जाणार आहे. प्रशासकीय मान्यतेनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून निधीचे वितरण कामाच्या प्रगतीनुसार पुरातत्व विभागाच्या सहायक संचालकांना केले जाणार आहे.
कोट
रायगड जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून गडकिल्ले आणि संरक्षित स्मारकांच्या संवर्धनासाठी चालू आर्थिक वर्षात 9 कोटी 90 लाख रुपयांचा निधी राखून ठेवण्यात येणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि लोकप्रतिनिधींची मागणीनुसार संवर्धनासाठी निधी वर्ग करण्यात येणार आहे. राज्य पुरातत्व विभागाकडे असणाऱ्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यावर भर दिला जाणार आहे. नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होऊन गडकिल्ले आणि संरक्षित स्मारकांचे संवर्धन करण्यास सुरुवात होईल .
जयसिंग मेहेत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी