रायगडच्या मुलींचा सलग दुसरा विजय

| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणीस वर्षाखालील मुलींच्या एकदिवसीय 50 षटकांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा सध्या रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने जिल्ह्यातील विविध मैदानांवर उत्साहाच्या वातावरणात सुरू आहे.

पेण येथे छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर रायगडच्या मुलींच्या संघाचा सामना सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मुलींच्या संघाबरोबर खेळला गेला, अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यात रायगडच्या संघानी सिंधुदुर्गच्या संघावर 8 धावांनी विजय मिळवत विजयाचा प्रवास सुरू ठेवला आहे. रायगडच्या मुलींच्या संघानी साखळी फेरीत सलग दुसरा विजय मिळवला असून, संघाचे मनोबल उंचावले आहे. प्रथम फलंदाजी करताना रायगडच्या संघानी 28.3 षटकांमध्ये सर्व गडी बाद 123 धावाच धावफळकावर नोंदवल्या त्यामध्ये रायगडच्या संघाची सलामीवीर तंत्रशुद्ध तडाखेबाज फलंदाज ब्रतती राय हिने चौफेर टोलेबाजी करत 53 धावांची दमदार खेळी केली तिला काव्या धावडे हिने बहुमूल्य 25 धावा करून साथ दिली. सिंधुदुर्ग कडून समृद्धी जोशीलकर हिने सर्वाधिक 5 तर श्रेया पाटील व कृत्तिका सोने ह्यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले. सिंधुदुर्गच्या संघाला जिंकण्यासाठी 50 षटकांमध्ये अवघ्या 124 धावांची गरज असताना संघाचा संपूर्ण डाव 115 धावसंखेवर गडगडला, रायगडच्या भेदक गोलंदाजी समोर सिंधुदुर्गच्या संघानी अक्षरशः नांगी टाकली समृद्धी कांबळे हिने 4 तर समिधा तांडेल हिने 2 फलंदाज बाद करत संघाला अटीतटीच्या झालेल्या सामन्यात विजय मिळवून दिला, रायगडच्या संघाने अप्रतिम क्षेत्ररक्षण करत तीन फलंदाज धावबाद केले, परिणामी रायगडच्या मुलींच्या संघाने सामना 8 धावांनी जिंकला. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील सचिव प्रदीप नाईक यांच्यासह आरडीसीए सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी संघाचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले असून पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version