पर्यटन स्थळे, हॉटेल, रिसॉर्ट हाऊसफुल
| अलिबाग | प्रतिनिधी |
2023 या सरत्या वर्षाला निरोप आणि 2024 या नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. वर्ष पूर्तीच्या आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टारंट, लॉजींग, कॉटेजेस हाऊसफुल झाली आहेत. जिल्ह्यामध्ये रविवारी थर्टी फस्ट साजरा केला जाणार आहे. दुसऱ्या दिवशी सोमवारी पहाटेपर्यंत उत्साह राहणार आहे. त्यामुळे नववर्षाचे स्वागत धुमधडाक्यात होणार असल्याचे दिसून येत आहे.
नाताळ सणानिमित्त आलेल्या पर्यटकांमुळेही रायगड जिल्ह्यातील पर्यटनच चांगलेच बहरले होते. त्यानंतर थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी गेल्या दोन दिवसांपासून पर्यटकांनी जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांवर मुक्काम ठोकला आहे. जानेवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत विविध हॉटेल बुक झालेली आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध हॉटेल, रेस्टारंट, रिसॉर्टमध्ये नाईट पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या खाद्य पदार्थांवर वेगवेगळ्या सवलती ठेवण्यात आल्या आहेत. यंदा पहाटे पाच वाजेपर्यंत थर्टी फर्स्ट साजरा करण्याची परवानगी दिली असली, तरीही रात्री बारावाजेपर्यंतच स्पिकर वाजण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पर्यटकांना रात्री बारा वाजेपर्यंतच गाण्याच्या ठेक्यावर नाचता येणार आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या दारुच्या दुकानांमध्ये मद्य खरेदीला सुरुवातदेखील सुरु झाली आहे. मद्याचे पेले रिचवत आणि गाण्याच्या ठेक्यावर पर्यटक धमाल करण्यास सज्ज झाले आहेत. अलिबाग, वरसोली, आक्षी, नागाव, किहीम, काशीद, मुरुड, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन येथील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. माथेरानमध्ये देखील पर्यटकांनी गर्दी केली आहे. मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने हॉटेल, रिसॉर्ट, कॉजेट, लॉजींग, पर्यटनावर आधारित असणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची चंगळ होत असल्याचे चित्र आहे.त्यामध्ये स्थानिकांना रोजगाराचे साधन खुले झाले आहे.
कॅटर्ससह खाणावळी सज्ज रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, काशिद,रेवदंडा, नागाव, श्रीवर्धन किनारपट्टीवर वर्षाअखेरला पर्यटनासाठी मोठी गर्दी असते. यावर्षी तीन लाखाहून अधिक पर्यटक रायगडातील पर्यटनाचा आनंद लुटण्याची शक्यता आहे. पर्यटकांना घरगुती पध्दतीच्या भोजनांचा आनंद घेता यावा यासाठी स्थानिक केटर्स, खाणावळी या देखील सज्ज झाली आहेत. मोदक, डाळ-भात, पुरणपोळी अशा शाकाहारी पदार्थांबरोबरच मटण वडे, कोंबडीवडे, तसेच ताज्या माशांपासून बनविलेले विविध पदार्थ अशा खास कोकणातील रुचकर आहारावर पर्यटकांना चांगलाच ताव मारता येणार आहे.
नियमांचे पालन करीत नव्या वर्षाचे स्वागत करा मिनी गोवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगडच्या किनार पट्टीवर सध्या पर्यटकांची मांदीयाळी पहावयास मिळत आहे. येणा-या पर्यटकांना कोणताही त्रास होऊ नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करुन नवीन वर्षाचे स्वागत कारावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.