रायगड, कोल्हापूर,मुंबई शहर, पुणे, यांची दुसर्‍या फेरीत

| अहमदनगर । प्रतिनिधी ।
70 व्या वरिष्ठ गट पुरुष महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत रायगड, कोल्हापूर, मुंबई शहर, पुणे यांनी दुसरा विजय मिळवीत महिला गटात बाद फेरी गाठण्याचा मार्ग मोकळा केला. पुरुषांत नांदेड, मुंबई शहर यांनी देखील बाद फेरी गाठण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले. अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी फेडशनच्या विद्यमाने नगरच्या वाडिया पार्क मैदानावर मॅटवर सुरू असलेल्या महिलांच्या इ गटात कोल्हापुरने नांदेडला 34-28 असे नमवित आपली आगेकूच केली. मुंबई शहरने ब गटात दुसरा विजय मिळविताना धुळ्याला 55-18 असे लीलया पराभूत केले.

रायगडने महिलांच्या फ गटात सांगलीला 24-21 असे चकवीत आपली आगेकूच सुरू ठेवली. अत्यंत चुरशीने खेळलेल्या या सामन्यातील पहिल्या डावात रायगड 09-12 अशा 3 गुणांनी पिछाडीवर होते. उत्तरार्धात ही कसर भरून काढत रायगडने 3 गुणांनी सामना आपल्या बाजूने झुकविला. रचना म्हात्रे, ऋचा भगत यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते.

सिंधुदुर्गने फ गटात जळगांवला 37-36 असे चकवीत पहिला विजय साकारला. नांदेडने पुरुषांत धुळ्याला 49-37 असे चीत करीत आगेकूच केली.अक्षय जाधव नांदेडकडून तर महेंद्र रजपूत धुळ्याकडून उत्कृष्ट खेळले. ठाण्याने फ गटात परेश हरड, उमेश म्हात्रे यांच्या उत्तम खेळाच्या जोरावर सिंधुदुर्गला 43-21 असे नमविले. सिंधुदुर्गचा मयुर नाईक, आनंद परब छान खेळले. लातूरने उस्मानाबादला 36-30 असे पराभूत केले.पुरुषांच्या क गटात मुंबई उपनगरने परभणीला 28-22 असे पराभूत केले. मुंबई शहरने ब गटात दुसरा विजय साकारताना. सांगलीला 51-23 असे सहज नमवित बाद फेरी गाठण्याचा आपला मार्ग मोकळा केला. महिलांच्या क गटात नाशिकने मुंबई उपनगरला 24-23 असे चकवीत कबड्डी रसिकांना आश्चर्याचा धक्का दिला. महिलांच्या इ गटात नांदेडने बीडला 49-47 असे नमवित पहिल्या विजयाची नोंद केली.

Exit mobile version