रायगडच्या दोघांचा युवा संसदेत सहभाग

तैसिन, हर्षदने केले जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व
| अलिबाग | वार्ताहर |
नेहरू युवा केंद्र संघटन, क्रीडा मंत्रालय भारत सरकार आणि युनिसेफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने 19 आणि 20 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई येथे राज्यस्तरीय युवा संसद आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये अलिबागमधून तैसिन अहमद छापेकर आणि खालापूरमधून हर्षद पाटील यांनी रायगड जिल्ह्याचे नेतृत्व केले.
विरोधी पक्ष पॅनेलमध्ये बसून तैसिन छापेकरने आदिवासींच्या समस्या व आरोग्यसंबंधी प्रश्न विचारले. आदिवासी बांधवांमध्ये सिकलसेल ॲनिमियाचा वाढता प्रभाव व त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र कायमस्वरूपी देण्यात यावे यावर प्रश्न विचारून चर्चा झाली. तर हर्षद पाटील याने स्वच्छता, कचऱ्याची योग्य पद्धतीने न होणारी विल्हेवाट आणि पाण्याचे भेडसावणारे प्रश्न यावर चर्चा केली.

राज्य युवा संसद मुंबई येथे संपूर्ण महाराष्ट्र व गोवा राज्यातील सर्व जिल्ह्यांतून निवडून आलेल्या मंत्री व तरुण खासदाराशी देशाच्या व राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. विधानसभा, विधानपरिषद, राज्यपालभवन या ठिकाणी युवा संसदेच्या तरुणांनी भेटी दिल्या. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषद भवनात राज्यस्तरीय युवा संसदेच्या युवा खासदारांना मार्गदर्शन केले.

यापूर्वी तैसीन हिने नॅशनल यूथ फेस्टिव्हल कर्नाटका हुबली येथे रायगडचे प्रतिनिधित्व केले. तर दिल्ली इंडिया गेट येथे झालेल्या ‌‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या कार्यक्रमात हर्षद व तैसीन यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.

Exit mobile version