कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा संपन्न
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात 48 वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा पार पडली. या स्पर्धेत रायगड पोलीस दलाने सर्वसाधारण विजेतेपदावर विजयाची मोहर उमटवली. मान्यवरांच्या उपस्थितीत रायगड संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. गत वर्षीप्रमाणे यंदाही रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. बेस्ट ॲथलेट म्हणून रत्नागिरीमधील शितल पिंजरे व पालघरमधील आफताब सय्यद ठरले आहेत. त्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात सरखेल कान्होजी आंग्रे नगरीत व आरसीएफ क्रीडा संकुलामध्ये 20 ते 25 नोव्हेंबरपर्यंत क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. रायगड, नवी मुंबई आयुक्तालय, मिराभाईंदर आयुक्तालय, ठाणे ग्रामीण, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर या पोलीस दलातील 681 खेळाडूंनी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत सात सांघिक व नऊ वैयक्तीक खेळाचे प्रकार होते. त्यात फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॉक्सींग, कुस्ती, कराटे, खो – खो, स्विमिंग अशा अनेक प्रकारच्या खेळांचा समावेश होता.
पुरुष व महिला अशा वेगवेगळ्या गटात झालेल्या क्रीडा स्पर्धेत रायगड पोलीस दलातील संघाने विजयाची घोडदौड कायमच ठेवली. स्पर्धेतील पुरुष गटातील कबड्डीची अंतिम लढत रायगड पोलीस व नवी मुंबई यांच्यामध्ये झाली. त्यामध्ये रायगड संघाने चार गुणांनी आघाडी मारून विजय संपादन केला. शनिवारी या स्पर्धेचा समारोप झाला. त्यावेळी रायगड संघाला सर्वसाधारण विजेते, नवी मुंबई संघाला द्वीतीय व रत्नागिरी संघाला तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले.
यावेळी मिराभाईंदरचे अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, नवी मुंबई आयुक्तालय, मिराभाईंदर आयुक्तालय, ठाणे ग्रामीण, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर येथील पोलीस अधिकारी, खेळाडू व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.