रायगड पोलिसांचा सागर कवच अंतर्गत बंदोबस्त

सागरी सुरक्षेसाठी 600 हून अधिक अधिकारी, 22 आणि 23 मे रोजी ठेवणार बंदोबस्त

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

जिल्हा पोलिसांकडून सागरी सुरक्षेच्या दृष्टीने सागर कवच अभियान राबवण्यात येते. जिल्ह्यात सागरी सुरक्षा भक्कम राहावी यासाठी (दि.22) आणि (दि.23) मे रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यत सागर सुरक्षा कवच राबवण्यात येणार आहे. यासाठी सागरी किनारी भागात तपासणी नाके तयार करून पोलिसांकडून संशयित असलेली वाहने तपासली जातील.

या मोहिमेत जिल्ह्यातील पोलीस आणि सागरी तटरक्षक दलाचे सहाशेपेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी सहभागी होत आहेत. पोलीस विभाग व्यतिरिक्त महाराष्ट्र मेरीटाइम, मत्स्य व्यवसाय, सुरक्षा मंडळ, भारतीय तटरक्षक दल, सीमा शुल्क विभाग, सागर सुरक्षा दलाचे सदस्य हेदेखील सागर सुरक्षा कवच अभियानात सहभागी होणार आहेत. हे अभियान उद्या (दि.22 मे) सुरू होऊन (दि.23) मे रोजी सायंकाळी 6 वाजता संपणार आहे. सागर सुरक्षा कवच अभियानात सहभागी होण्यासाठी 84 पोलीस अधिकारी आणि 519 पोलीस कर्मचारी सज्ज झाले आहेत. रायगड जिल्ह्याला विस्तृत समुद्रकिनारा लाभला आहे. सागरी पोलीस ठाण्यांमार्फत जिल्ह्यातील समुद्रकिनारी होणार्‍या संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे काम केले जाते. जिल्ह्यातील सागरी सुरक्षा अधिक मजबूत ठेवण्यासाठी, तसेच दहशतवादी हल्ल्यांपासून सतर्क राहण्यासाठी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सागरी सुरक्षा कवच अभियान सुरू करण्यात आले आहे. सागरी मार्गाबरोबरच रस्त्याने येणार्‍या अनोळखी व्यक्तींवरही नजर ठेवली जाणार आहे.

या अभियानासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, महिला विभाग, बॉम्बशोधक पथक, गुन्हे शाखा, सायबर सेल अशा विविध खात्यांतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची राखीव पोलीस म्हणून नियुक्ती केली आहे. मार्च 1992 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यात वापरलेले आरडीएक्स हे रायगडमधील शेखाडीमार्गे नेण्यात आले होते. त्यानंतर जिल्ह्यातील सागरी सुरक्षा धोक्यात आली होती. त्यामुळे समुद्रमार्गे अथवा समुद्रकिनारी रस्त्याने दहशतवादी कारवाईवर नजर ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात सागरी पोलीस ठाणे बनवण्यात आली आहेत. जिल्ह्यात मांडवा, दिघी, दादर, श्रीवर्धन, हरिहरेश्‍वर मुरुड, बोर्ली या ठिकाणी सागरी पोलीस ठाणे आहेत. सागर सुरक्षा कवच अभियान दर सहा महिन्यांनी जिल्हा पोलीस दलाकडून राबवण्यात येते. जिल्ह्यातील सागरी किनारी भागात चेकपोस्ट तयार करून येणार्‍या जाणार्‍या संशयित वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जाते.

या ठिकाणी तपासणी नाके
धरमतर, पेझारी, साळाव, शिघ्र, इंदापूर, आंबेत, साई, मांदाड, कोले, शिरगांव, वांगणी, खारी, तांबडी
Exit mobile version