रायगड पोलीस दलामध्ये 272 जागांची भरती

| आगरदांडा | वार्ताहर |

रायगडातील युवा पिढीमध्ये बहुप्रतिक्षित असलेला पोलीस शिपाई भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्ह्यात 272 पोलीस शिपाई पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. तशा आशयाचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक यांनी काढल्याने तरुणांन मध्ये उत्साहा दिसुन येत आहे.

या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना संगणकीय प्रणालीद्वारे दि. 3 ते 30 नोव्हेंबर पर्यंत आवेदन पत्रे भरावी लागणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांना एका वेळी एकाच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येणार आहे. अर्थात एकावेळी दोन अथवा त्यापेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये अर्ज करता येणार नाही. तसेच मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात अर्ज दाखल करू शकतात. मात्र खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना मागास प्रवर्गात अर्ज दाखल करता येणार नाही. या भरती प्रक्रियेमधील अटी व शर्तीही पोलीस महासंचालकांनी जारी केल्या आहेत.

उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द होईल. पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम 50 गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेण्यांत येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यांत येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.

उमेदवारास पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.

Exit mobile version