रायगड पोलीस दलाचा ठेवा वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून करणार

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

राज्यातील पोलिस दलाला एक मोठा इतिहास असून या झाकोळलेल्या इतिहासाला उजाळा देण्याचे काम रायगड पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांंच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी पोलीस दलाच्या आजवरच्या वाटचालीचा मौल्यवान ठेवा वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून जतन केला जाणार आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयात येत्या दोन तिन महिन्यात हे वस्तुसंग्रहालय उभे राहणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
ब्रिटीश काळखंडापासून अस्तिवात असलेल्या रायगड जिल्ह्याचा पोलीस दलाला एक इतिहास लाभला आहे. सुमारे दोन शतकं रायगडच्या पोलीस दलाने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. या स्थित्यंतराचा वारसा सांगणार्‍या अनेक वस्तु, शस्त्र, कागदपत्रं आजही पोलीस दलाकडे आहेत. हा मौल्यवान ऐतिहासिक ठेवा संकलीत करण्याचे काम सध्या सुरु आहे. त्याचे संकलन पुर्ण झाल्यानंतर प्रेझेंटेशन फॉर्ममध्ये तयार करुन तेे प्रदर्शनिय सादरीकरण आणि त्याची माहिती तयार करुन त्याचे छोटेखानी संग्रहालय तयार करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत.

बिटीशकालिन पोलीस व्यवस्था कशी होती. त्यात स्वातंत्रप्राप्ती नंतर कसे बदल होत गेले. गुन्हेगारीचे स्वरूप कसे बदलत गेले. पोलीस दलातील शस्त्रामध्ये कशी सुधारणा होत गेली. पोलीसांचे पोषाख कसे बदलत गेले. याशिवाय पोलीस मुख्यालयातील जुन्या वास्तूंचा इतिहास, पथदिव्यांची व्यवस्था, पोलीसांच्या संपर्क यंत्रणांचे बदलते स्वरुप, पोलीस अधिक्षक बंगल्याचा इतिहास या वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयातील समाधान कक्ष आणि मध्यवर्ती भागात असलेल्या मोकळ्या जागेत हे वस्तुसंग्रहालय तयार केले जाणार आहे. हे वस्तुसंग्रहालय अलिबाग मधील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरु शकेल. या संग्रहालयाच्या माध्यमातून रायगडच्या पोलिस दलाचा दैदिप्यमान इतिहास समोर येण्यास मदत होणार आहे.

—————

सदर वस्तुसंगहालयासाठी दुर्मिख वस्तूंचे संकलन सुरु असून ते पुर्ण झाल्यावर त्याची सुसत्रपणे मांडणी करून पोलीस अधिक्षक कार्यालयात एक छोटेखानी वस्तुसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. ज्यामुळे रायगड पोलीस दलाच्या इतिहासाची माहिती जनसमान्यांना तसेच पर्यटकांना होऊ शकेल. या दुर्मिळ वास्तुंचे जतन आणि संवर्धनही होण्यास यामुळे मदत होईल.

सोमनाथ घार्गे, पोलीस अधिक्षक, रायगड
Exit mobile version