गणेशोत्सवासाठी रायगड पोलीस सज्ज


बंदोबस्तासाठी 400 हून अधिक पोलिसांचा फौजफाटा; पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंची माहिती

| पेण | प्रतिनिधी |

चाकरमानी आणि त्यांचा गणेशोत्सव हा वाहतूक कोंडी, खड्‌‍ड्यातून होत असतो. मात्र, काही प्रमाणात यावर्षी चाकरमान्यांचा गणेशोत्सव सुखकर होताना दिसत असतानाच रायगड पोलीस गणेशभक्तांसाठी सज्ज झाले आहेत. गणेशोत्सव काळात महामार्गावर 400 हून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असतील, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी वाहतुकीच्या नियोजनासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी तीन दिवस गणेशोत्सव काळात महामार्गावर 400 हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्ताला असणार आहेत. रस्त्यावर असताना मोबाईलचा वापर कमी करा, पुढील वर्षी महामार्ग पूर्ण झाल्यावर फक्त 50 ते 100 पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्त करतील. तर गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी 10 सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले असून, जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. पोलीस व वाहतूक पोलिसांना जॅकेट, रिफ्लेक्टर, बॅरिकेट, आधुनिक मॅपद्वारे दिशादर्शक तक्ते तसेच आदी सुरक्षतेची साधने देऊन रायगड पोलीस गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासाठी सज्ज असल्याचे सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. तसेच त्यांनी बंदोबस्त करताना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या सुरक्षेतचीदेखील काळजी घेण्याचे आवाहन केले.

यावेळी व्यासपीठावरसोमनाथ घार्गे, अतुल झेंडे, पेण उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, अलिबाग उपविभागीय पोलीस अरुण भोर, कर्जत उपविभागीय पोलीस विजय लगारे, रोहा उपविभागीय पोलीस सोनाली कदम, खालापूर उपविभागीय पोलीस विक्रम कदम, उपविभागीय पोलीस संजय सावंत, वडखळ पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, दादर पोलीस निरीक्षक अजित गोळे, खोपोली शीतलकुमार राऊत तसेच मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version