रायगडच्या राजकारणाला कलाटणी देणारा मेळावा; आ. जयंत पाटील यांचा विश्‍वास

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील कार्यकर्ता हा 50 वर्षे पाहात असून, मागील असंख्य वर्षांच्या इतिहासात आजचा मेळावा कर्जत तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे ताकद दाखवणारा आहे. त्यामुळे रायगडाच्या राजकारणात आजचा मेळावा कलाटणी देणारा आहे, असा ठाम विश्‍वास आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तर शेकापला कोणत्याही राजकीय पक्षाने गृहित धरू नये, असा इशारा विरोधी पक्षाला देऊन जयंत पाटील यांनी शेकाप रायगड जिल्हा परिषदेमधील सर्वात मोठा पक्ष असेल आणि आमच्याशिवाय कोणीही जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करू शकत नाही, असे सांगितले.

कर्जत तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याचा मेळावा कर्जत किरवली येथील शेळके मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील, शेकाप महिला आघाडी अध्यक्षा आशा शामसुंदर शिंदे, पक्षाचे जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते विलास थोरवे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे, शेकाप पुरोगामी मोर्चा जिल्हा अध्यक्ष देवा पाटील, खालापूर तालुका शेकाप चिटणीस किशोर पाटील, माजी तालुका चिटणीस संतोष जंगम आदी मान्यवर उपस्थित होते.

कर्जत तालुक्यात 75 टक्के तरुण कार्यकर्ते पक्षात आहेत आणि हीच शेकापची खरी ताकद आहे, असे आ. जयंत पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, स्थानिक कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाची कोणत्या पक्षाबरोबर आघाडी आहे की युती आहे की आपण स्वबळावर लढणार हे माहिती नाही. रायगड जिल्ह्यात साडेचार लाख मते शेतकरी कामगार पक्षाची असून, कर्जत तालुक्यातील आमदार हा यापुढे आपल्याच पक्षाचा झाला पाहिजे. आपल्याला विश्‍वासात घेतल्याशिवाय कोणीही राजकीय हालचाल करू शकत नाही, असे सांगत आजची शेकापची वाढलेली ताकद ही महत्त्वाची असून, त्यामुळे मला विश्‍वास वाढला आहे. मुंबईचा वाढता पसारा पाहता कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कार्यकर्त्यांना एकत्रित आणण्याचे काम तालुका चिटणीस श्रीराम राणे यांनी केले आहे. त्यामुळे आता आम्ही पूर्वी गरीब समजत असलेल्या कर्जत तालुक्याने आपली ताकद वाढवली आहे. पण, आता आम्ही कर्जतला आदिवासी तालुका म्हणणार नाही, तर शेकापचा बालेकिल्ला म्हणूनच संबोधणार असे यावेळी मान्य केले. आजचा मेळावा कर्जतच्या राजकारणाला कलाटणी देणारा आहे, असा विश्‍वासदेखील आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील राजकारणावर मी बोलणार नाही, कोणाशी आघाडी किंवा युती करायची हे सांगणार नाही. इथे काँग्रेस संपुष्टात आली असून, आता शिवसेना दोन झाल्यात आणि त्यामुळे चार महिन्यांत नियोजनबद्ध पक्षाचे काम करण्याची गरज आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी आणि मुस्लिम समाज आपल्याबरोबर आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करा आणि नवीन पद्धतीने काम करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन आ. पाटील यांनी केले. पहिल्यांदा कार्यकर्त्यांचा उत्साह बघून खुश होऊन कर्जत तालुक्यातून जात आहे. आमचा कार्यकर्ता नारायण डामसे हा कर्जत तालुक्यात इस्पिकचा एक्का असून, तो कुठेही लढू शकतो असे जाहीर करून कर्जत तालुक्यात नवीन टीमकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या असून, कर्जत तालुक्यात लाल बावट्याचा आमदार निवडून यायला फार उशीर लागणार नाही, असा विश्‍वास आ. पाटील यांनी व्यक्त केला.

दरम्यान, कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्जत तालुका शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस श्रीराम राणे, जेष्ठ कार्यकर्ते गजानन पेमारे, दत्तात्रय पिंपरकर, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र हजारे, विलास तालुका महिला आघाडी अध्यक्षा जयवंती हिंदोळा, गुरोगामी युवक संघटना तालुका अध्यक्ष महेश म्हसे, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश फराट, नेरळ विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र विरले यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात धोत्रेवाडी आणि चाहूवाडी येथील महिलांच्या आदिवासी नृत्याने झाली, तर यावेळी मेळाव्याचे सूत्रसंचालन हरेश मोकल यांनी केले. शेकापचे कर्जत तालुका कार्यकर्ता मेळाव्याची सुरुवात प्रास्ताविक ज्येष्ठ कार्यकर्ते विलास थोरवे यांनी केले. यावेळी बोलताना श्री. थोरवे यांनी कर्जत तालुक्यातील शेकापच्या वाटचालीचा आढावा घेतला.

हा मेळावा आमच्या अनेक वर्षांच्या राजकीय वाटचालीत केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. शेतकरी कामगार पक्ष हा मोठ्या सत्तेत नाही, परंतु जनतेशी बांधिलकी ठेवून विकासकामे करीत आहे, त्यामुळे शेकाप संपला असे म्हणणारे संपले आहेत. शेकापचा कार्यकर्ता पेटून उठला तर जिल्ह्यातील सर्व पक्षांना युती किंवा आघाडी करण्यासाठी आपल्याकडे यावे लागेल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पेटून उठण्याची वेळ आली आहे.

आ. जयंत पाटील
शेकाप सरचिटणीस

शेकडो कार्यकर्ते शेकापमध्ये
या कार्यक्रमात राष्ट्रवादी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तानाजी मते, कळंब ग्रामपंचायत माजी सरपंच प्रमोद कोंडीलकर, उमेश वाघमारे, सागर बदे, ममदापूर ग्रामपंचायत सदस्य कल्पना डांगरे, तसेच गजानन डांगरे, खांडस ग्रामपचायती मधील बांगरवाडी येथील कार्यकर्ते रवी बांगारे, उमेश बांगरे, शांताराम निरगुडे, अशोक सराई, समिर बंगारे, मोरेवाडी येथील प्रकाश केवारी, ओलमन ग्रामपंचायत मधील पेंढरी मुकुंद उगले, लक्ष्मण काठे, बाबू भुसारी, वाळकु केवरी, अनंता गिरे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते तसेच हुमगाव येथील कातकरी वाडी मधील सर्व कार्यकर्ते तर बेडीसगाव येथील दीपक वाघ, बुधाजी धुमने आदी गावातील कार्यकर्ते यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.

Exit mobile version