| रायगड | प्रतिनिधी |
केवळ पत्रव्यवहारापुरता मर्यादित न राहता सामान्य नागरिकांच्या भवितव्याला सुरक्षित करणाऱ्या बचत व विमा योजनांच्या माध्यमातून डाक विभाग सामाजिक बांधिलकी जपत आहे. जंगल, डोंगर आणि समुद्राने वेढलेल्या, सुमारे 90 टक्के ग्रामीण भाग असलेल्या रायगड जिल्ह्यात विमा व बचतीबाबतचा मर्यादित प्रतिसाद बदलत रायगड डाक विभागाने देशपातळीवर इतिहास रचला आहे.
डाक विभागाकडून दरमहा ठराविक दिवशी साजरा होणाऱ्या ‘लॉगिन डे’ उपक्रमांतर्गत अधिकाधिक नागरिकांपर्यंत विमा संरक्षण पोहोचवण्याचा संकल्प राबवला जातो. “इथे बिझनेस होत नाही” ही सर्वसाधारण धारणा मोडीत काढत, रायगडचे डाक अधीक्षक सुनील थळकर यांनी सेवाभावी दृष्टिकोनातून कामगिरीचा नवा मापदंड उभा केला. “आपली कामगिरी आकड्यांसाठी नाही, ती सेवेची आहे. जास्तीत जास्त लोकांचे भले कसे करता येईल, हेच आपले खरे ध्येय असले पाहिजे,” या विचारातून त्यांनी कर्मचारी वर्गात विश्वास, अभिमान आणि आत्मविश्वास निर्माण केला. ‘टार्गेट’ हा केवळ आकडा नसून, कामगिरी अशी असावी की ती पाहून स्वतःलाच अभिमान वाटावा, असा ठाम पण हळुवार संवाद त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याशी साधला. गेल्या वर्षी बचत खात्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद कामगिरी केल्यानंतर, यावर्षी “विमा ही काळाची गरज आहे” या वास्तवावर लक्ष केंद्रीत करत पोस्टल लाईफ इन्शुरन्स आणि ग्रामीण डाक जीवन विमा योजनांचा प्रभावी प्रसार करण्यात आला.
रायगडची ऐतिहासिक एकदिवसीय कामगिरी
प्रीमियम कलेक्शन:57,42,311रुपये
सम ॲश्युरन्स: 26,51,25,000 रुपये
पॉलिसी संख्या:1024
आजपर्यंत एका दिवसात 7.22 लाख प्रीमियम हा रायगडचा विक्रम होता. तो विक्रम मोडण्याचा विचार करताना रायगड थेट ऑल इंडिया नंबर 1 बनला आहे.ही माझी वैयक्तिक कामगिरी नाही. रायगड डाक विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनापासून केलेल्या कामाचा हा सामूहिक परिणाम आहे.सामूहिक प्रयत्न झाले, तर अशक्य काहीच नसते. यान भूतो न भविष्यती कामगिरीमुळे रायगड डाक विभागाने सिद्ध केले आहे.
-सुनील थळकर
डाक अधीक्षक, रायगड







