जंजिरा चॅलेंजर्स, रायगड वॉरियर्स विजयी
| रायगड | प्रतिनिधी |
अलिबाग येथील आरसीएफच्या मैदानावर सुरू असलेल्या रायगड प्रीमियर लीग पंचवीस वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेतल्या साखळी फेरीतील सामन्यात शुक्रवारी जंजिरा चॅलेंजर्स संघाने खांदेरी-उंदेरी किंग्स संघावर 78 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या जंजिरा चॅलेंजर्स संघाने 20 षटकांमध्ये 7 गडी गमावत 161 धावा फलकावर नोंदवल्या. ऋषिकेश राऊत याने केलेल्या दमदार 73 धावांच्या खेळीमुळे संघाची धावसंख्या 161 वर पोहोचली. अवघ्या 39 चेंडूंचा सामना करत 5 षटकार आणि 3 चौकार ऋषिकेश राऊत यांनी ठोकले. खांदेरी-उंदेरी किंग्सकडून निकुंज विठलानी यांनी दोन फलंदाज बाद केले. प्रत्युत्तरात खांदेरी-उंदेरी किंग्स संघ 13.2 षटकांमध्ये 82 धावाच उभारू शकला. निकुंज विठलानीच्या 26 धावा वगळता कोणताही फलंदाज टिकाव धरू शकला नाही. जंजिरा चॅलेंजर्सकडून ऋषभ बुजबळ, सिद्धार्थ म्हात्रे, रिझवान खान यांनी टिचून गोलंदाजी करत प्रत्येकी तीन फलंदाज बाद केले. जंजिरा चॅलेंजर्स संघाने साखळी फेरीत 4 पैकी 4 सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे.
दुसर्या सामन्यात रायगड वॉरियर्स संघाने द्रोणागिरी मास्टर्स संघाचा 4 गडी राखून पराभव केला. द्रोणागिरी मास्टर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये सर्व गडी गमावत 127 धावा केल्या. यश मानेने 36, तर विशाल सकपाळने 26 धावांचे योगदान दिले. रायगड वॉरियर्स कडुन हार्दीक कुरुंगळे यांनी 3 फलंदाज बाद केले. प्रतिउत्तर देतांना रायगड वॉरियर्स संघांनी 16.5 षटकांमध्ये 6 गडी गमावत 127 धावांचे लक्ष पार केले,ओम जाधव यांनी सर्वाधिक 40 स्वानंद कदम 30 तर अजिंक्य रसाळ यांनी 25 धावांची बहुमूल्य खेळी करत संघाला विजय मिळवुन दिला. द्रोणागिरी मास्टर्सकडुन चिन्मय चाफेकर यांनी 2, करण साखरकर व साईश खैरे यांनी प्रत्येकी 1 फलंदाजला बाद केले. ऋषिकेश राऊत व हार्दीक कुरुंगळे यांना सामनावीर म्हणून आरपीएलचे सचिव जयंत नाईक, अभिजित तुळपुळे, अक्षय गुळेकर, संदेश गुंजाळ, शैलेश घरत, संदिप जोशी, अँड. पंकज पंडित यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.