। उरण । वार्ताहर ।
अलिबागमधील नागावमध्ये बिबट्याने दहशत माजवली असतानाच उरण तालुक्यातील कोप्रोली, पुनाडे मधील डोंगर परिसरातील आदिवासी नागरी वस्तीत मंगळवारी (दि. 9) रात्रीच्या अंधारात बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर बिबट्याने दोन बकऱ्या, दोन कुत्रे खाऊन टाकले आहेत. सदर बिबट्या शिरल्याच्या बातमीने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग, स्थानिक नागरिकांचे आठ तासांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप बिबट्याला जेरबंद करण्यात आलेले नाही. त्यामुळे बिबट्या आलारे आला तरी उरणकरांनो सावधान अशी परिस्थिती उरण तालुक्यात निर्माण झाली आहे.
पुनाडे, कोप्रोली मध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास बिबट्या शिरल्याचे कळताच नागरिकांमध्ये एकच धावपळ माजली आणि भीतीचे वातावरण पसरले. अनेकांनी घराची दारे-खिडक्या बंद करुन घरात राहणे सुरक्षित समजले. तर, काहींनी बिबट्याला पाहण्यासाठी घटनास्थळी धाव घेतल्याचे दिसून आले. घटनास्थळी वनविभाग आणि आदिवासी बांधव, परिसरातील नागरिकांनी धाव घेतली आहे. सदर बिबट्यांनी दोन बकऱ्या दोन कुत्रे खाऊन टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून वारंवार सूचना देण्यात येत आहेत. बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे.





