शिवजयंती निमित्त रायगडकरांचा उत्साह शिगेला

गडकिल्ले संवर्धन, स्मारक स्वच्छतेचे आयोजन

| सुधागड-पाली | वार्ताहर |

रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे व ऐतिहासिक वारशाचे प्रतीक आहे. या गड किल्ल्यांचे संवर्धन, स्वच्छता, तसेच महाराजांचे विचार जनसामान्यांच्या पोहोचवण्यासाठी व्याख्याने, शिवस्मारक सुशोभीकरण, शिवकालीन युद्धकलेचा प्रचार आदी विधायक कार्य जिल्ह्यातील अनेक शिवप्रेमी आणि संस्था करतांना दिसत आहेत. यामध्ये लहान मुलांसह तरुण-तरुणी व ज्येष्ठांचा उल्लेखनीय समावेश आहे. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व त्यांचे कार्य जनमाणसांत पोहचत आहे. दरम्यान, शिवजयंती निमित्त रायगडकरांचा उत्‍साह शिगेला पोहोचला असल्याचे चित्र सर्वत्र निदर्शनास येत आहे.

छ. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले असंख्य छोटे-मोठे गडकिल्ले रायगड जिल्ह्यात आहेत. वर्षभर येथील शिवप्रेमी व दुर्गसंवर्धन संघटना संवर्धन व साफसफाईची कामे करत असतात. तसेच, पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शिवप्रेमी या मोहिमांत सहभागी होत असतात. विशेषतः शिवजयंतीला गडांच्या सजावटीबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे अनेक दुर्लक्षित किल्ले नव्याने उजेडात येत आहेत. यामुळे शिवप्रेमी आणि स्थानिक समुदाय एकत्र येऊन गडकिल्ल्यांच्या परिसराची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षणाचे कार्य करत आहेत. या उपक्रमांमुळे गडकिल्ल्यांचे सौंदर्य टिकून राहते. अशा विविध उपक्रमांद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचे जतन आणि प्रचार होत आहे. तसेच, शिवजयंतीनिमित्त ठिकाणावरून शिवज्योत देखील निघतात.

शिवजयंती साजरी करण्यासाठी निवेदन
सुधागड तालुक्यातील महेश पोंगडे महाराज यांनी शिवजयंती साजरी करण्यासाठी सुधागड तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळेत निवेदन दिले आहे. ‌‘शिवशाही ते लोकशाही व्हाया संविधान' अंतर्गत मुलांना शिवशाही, लोकशाही आणि संविधानाची ओळख व्हावी. त्यातून त्यांच्या कल्पनाशक्तीला पालवी फुटावी. देश सुधारण्याच्या नव नवीन कल्पना स्फूराव्यात आणि लोकजागृती व्हावी, यासाठी शालेय स्तरावर शिवजयंतीचे आयोजन होणार असल्याचे पोंगडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

सर्वांनाच महाराजांबद्दल नितांत श्रद्धा आणि प्रेम आहे. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. त्यांचे गडकिल्ले आजही त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत आहेत. नव्या पिढीलाही ते चैत्यन्य देत आहेत. यासाठी गडकिल्ले स्वच्छता मोहीम व गडसंवर्धनाचे काम न चुकता करतो. त्यातून एक ऊर्जा मिळते. शिवाय हा ऐतिहासिक ठेवा पुढील पिढीसाठी अबाधित व संरक्षित राहतो.

दत्तात्रय सावंत, दुर्गसंवर्धक, पाली
Exit mobile version