| रायगड | प्रतिनिधी |
रायगड किल्ल्यावर जाण्यासाठीची रोपवे सेवा देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षा तपासणीसाठी जवळपास दोन महिने बंद राहणार आहे. 16 नोव्हेंबरपासून सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
या कालावधीत रोपवे मार्ग, उपकरणे आणि सुरक्षा यंत्रणेची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांना गडावर जाण्यासाठी पायरी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. पायरी मार्गाने गडावर पोहोचण्यासाठी साधारण एक ते दीड तास, तर रोपवेने अवघ्या पाच ते सात मिनिटांत गडावर पोहोचता येते. रोपवे कंपनीचे व्यवस्थापक राजेंद्र खातू यांनी पर्यटकांनी पायरी मार्गाचा वापर करताना पाणी, योग्य पादत्राणे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि हृदयविकार असलेल्या पर्यटकांनी पायरी मार्गाचा वापर करताना विशेष काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. रोपवे सेवा बंद राहणार असल्याने रायगडला भेट देणाऱ्या पर्यटकांनी प्रवासाचे नियोजन करताना या बदलाची नोंद घ्यावी, असे व्यवस्थापनाने सांगितले आहे.
रायगड रोपवे दोन महिने बंद
