रायगड रोप-वेचा ‘इमॉस’सोबत करार

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड रोप-वेमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या अधिक सुरक्षिततेसाठी मिलेनियम रोप-वे कंपनीने स्विर्त्झलंडमधील इमॉस कंपनीशीही नुकताच सहकार्याचा करार केला. रायगड किल्ल्यावर रोप-वेची सुविधा पुरविणार्‍या मिलेनियम रोप-वे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जोग यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

राजेंद्र जोग म्हणाले, रायगड रोप-वेमधून गेल्या 28 वर्षांत 35 लाख प्रवाशांची वाहतूक झाली आहे. रोप-वे रेस्न्यू आणि इव्हॅक्युएशन तंत्रज्ञानामध्ये जगात इमॉस आघाडीवर आहे. 60हून अधिक देशांत त्यांची सेवा पुरविली जाते. रोप-वे क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून इमॉसबरोबर करार करण्यात आला आहे. त्यांच्या तंत्रज्ञांकडून देखभाल दुरुस्तीबरोबच जागतिक दर्जाचे प्रशिक्षणही मिळणार आहे.

केंद्र सरकारने पर्वतमाला परियोजना हा विकास कार्यक्रम आखला असून, त्याद्वारे देशात आगामी पाच वर्षांत 200 हून अधिक रोप-वे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी सध्याचे सर्व आणि आगामी रोप-वे प्रकल्पांचे ऑडिट, प्रवासी सुरक्षा, सुरक्षा आणि इव्हॅक्युएशन सिस्टीम आदींवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यामुळे इमॉसशी करार करण्यात आला आहे, अशी माहिती जोग यांनी दिली. तंत्रज्ञानात होत असलेल्या बदलांचा मागोवा घेऊन रायगड रोप-वेमध्येही बदल होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Exit mobile version