| माणगाव | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्याच्या महिला क्रिकेटच्या इतिहासात अभिमानाचा नवा अध्याय लिहिला गेला असून, 19 वर्षांखालील रायगड जिल्हा संघाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात पुणे संघावर एकतर्फी विजय मिळवत विजयी सलामी दिली. या ऐतिहासिक विजयाची नायिका ठरली माणगाव शहरातील कन्या स्वरा नितीन बामगुडे, जिने पहिल्याच सामन्यात आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात स्वराने अत्यंत आत्मविश्वासपूर्ण आणि आक्रमक फलंदाजी करत मोलाच्या 34 धावा केल्या. केवळ फलंदाजीतच नव्हे तर क्षेत्ररक्षणातही स्वराने आपली छाप पाडत 2 यष्टिचीत आणि 1 फलंदाजाला धावबाद केले. तिच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे रायगड संघाच्या विजयाला भक्कम पाया मिळाला. स्वराने आपल्या खेळीत संयम आणि आक्रमकतेचा उत्तम समतोल साधत 60 मिनिटे मैदानावर ठाम उभी राहत दोन सुरेख चौकारांच्या साहाय्याने 66.67 च्या सर्वाधिक सरासरीने धावा केल्या. तिच्या या धडाकेबाज आणि जबाबदार खेळीमुळे सामनाधिकारी यांनी तिला या एकदिवसीय सामन्याची ‘सामनावीर’ म्हणून गौरविले.
या सामन्यात रायगड संघाकडून भ्रताती रॉय (36), स्वरा बामगुडे (34) आणि संस्कृती पालकर (28) यांनी फलंदाजीत उल्लेखनीय योगदान देत संघाची धावसंख्या 6 गडी गमावून 198 धावांपर्यंत नेली. प्रत्युत्तरात पूणे येथील बास क्रिकेट अकॅडमी संघाला रायगडच्या गोलंदाजांनी जबरदस्त धक्के देत केवळ 83 धावांत गुंडाळले. गोलंदाजीत रायगड संघाकडून गार्गी साळुंखे आणि समिधा तांडेल यांनी प्रत्येकी 4-4 फलंदाज बाद करत पूणे संघाचा 115 धावांनी दारुण पराभव केला. हा सामना पूर्णतः एकतर्फी ठरला आणि रायगड संघाने आपल्या ताकदीचे जोरदार प्रदर्शन घडवले. या एकदिवसीय मालिकेत रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनसह सातारा, सिंधुदुर्ग, पूणे, ज्युडिशियल अकॅडमी, चंद्रोस क्रिकेट क्लब अशा एकूण सहा संघांचा सहभाग आहे. पहिल्याच सामन्यातील या दणदणीत विजयामुळे रायगड संघाचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. सामन्यानंतर पेण येथील स्टेडियमवर क्रिकेट रसिकांनी एकच जल्लोष करत रायगडच्या मुलींना भरभरून दाद दिली. यावेळी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, अरुण शिंदे, मालती म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी रायगड संघाचे मनापासून अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. माणगावच्या स्वरा बामगुडे हिच्या या यशामुळे केवळ कुटुंबच नव्हे तर संपूर्ण माणगाव व रायगड जिल्ह्याचा अभिमान उंचावला असून, भविष्यात तिच्याकडून आणखी मोठ्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







