आरोपी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
। चणेरा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील निडी गावात सोमवारी (दि.15) रात्री घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 20 वर्षीय तरुणीचा गळा आवळून खून केल्यानंतर आरोपी तरुणाने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्वी गणेश ताडकर (20) रा. निडी, ता. रोहा आणि रोहित जनार्दन पाटील (27) रा. निडी हे दोघे सोमवारी रात्री निडी येथील लक्ष्मण दुर्गाजी गडेकर यांच्या घरात होते. रात्री सुमारे 8.15 वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या रोहित पाटील याने तन्वीला मारहाण करून नायलॉनच्या दोरीने तिचा गळा आवळला. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने त्याच घरातील हॉलमध्ये पंख्याला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. संबंधित घराचे मालक लक्ष्मण गडेकर यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले असून, त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त परदेशात आहे. तर कुटुंबातील इतर सदस्य ठाणे येथे वास्तव्यास आहेत. घराची देखभाल तन्वीच्या आईकडे असल्याने घराची चावी त्यांच्याकडे असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त कार्यभार असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेरेकर आणि रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, या प्रकरणी नामदेव मनोहर मढवी यांच्या तक्रारीवरून रोहा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
