। पोयनाड । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चौदा वर्षाखालील मुलांच्या आंतरजिल्हा दोन दिवसीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघाने दमदार कामगिरी करत सुपर लीगमध्ये दिमाखदार प्रवेश मिळवला आहे. साखळी फेरीतील झालेल्या पाच सामन्यांमध्ये रायगडच्या संघाने दक्षिण विभाग व स्टार क्रिकेट अकॅडमी संघावर एका डावाने दणदणीत विजय मिळवला तर लातूर जिल्ह्याच्या संघावर पहिल्या डावाच्या आधारे विजयी मिळवला असून बलाढ्य अशा केडन्स क्रिकेट अकॅडमी व मेट्रो क्रिकेट अकॅडमी संघा बरोबरचा सामना अनिर्णित ठेवण्यामध्ये रायगडच्या संघाला यश आले आहे. आपल्या एच गटात रायगडच्या संघाने एकूण 19 गुण प्राप्त केले. साखळी फेरीत झालेल्या पाच सामन्यात रायगडच्या तंत्रशुद्ध तडाखेबाज फलंदाज आरव बरळ यांनी सर्वाधिक 415 धावा काढल्या त्यामध्ये दोन शतक व एका अर्धशतकाचा समावेश आहे तर अष्टपैलू खेळाडू व रायगडचा कर्णधार देव सिंग यांनी 387 धावा केल्या त्यामध्ये दोन शतक व एक अर्ध शतक त्यांनी केले.गोलंदाजी विभागात रायगडचा भेदक गोलंदाज विराज थोरात यांनी सर्वाधिक 19 बळी घेतले. त्यामध्ये एका डावात 5 बळी त्यांनी दोन वेळा घेतले आहेत, तर देव सिंग यांनी 15 फलंदाजाना तंबूचा रस्ता दाखवा आहे.







