रायगड विश्‍वजननी बँकेला टाळे

खोपोली, खालापूरातील खातेदारांचे पैसे बुडाल्याने खळबळ

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

खोपोली शहरात आरिहांत टॉवर डी येथे एका गाळ्यात रायगड विश्‍वजननी भारत निधी अर्बन बँकेचे कार्यालय सुरू केले होते. छोटे-मोठे दुकानदारांनी दररोजची रक्कम गोळा करण्यासाठी बँकेमार्फत एजंट नेमून खालापूर तालुक्यात व खोपोली शहरात बँकेची जाहिरात करून या बँकेचे मुख्य ऑफिस कर्जत शेळू येथे असल्याचे ग्राहकांना सांगितले होते. त्यामुळे अनेक दैनंदिन बचत खाते काढून त्यात रोजची रक्कम वसुली केली. वर्षभरात एक रकमी व्याजासह रक्कम मिळेल, या आशेवर असणार्‍या ग्राहकांना बँक बंद झाल्याची माहिती मिळताच मोठा धक्काच बसला. अनेक ग्राहक चौकशीसाठी बँकेत गेले, परंतू बँकेला टाळे असल्याने अनेक महिला ग्राहकांनी आरडाओरडा केला. त्याच वेळेस दररोज दैनंदिन रक्कम घेण्यासाठी येणारे एजंट यांना बोलविण्यात आले. त्यांना (दि.8) एप्रिलला अचानक बँकेला टाळे असल्याचे माहिती मिळाली. एजंट लोकांचे काम केलेले पगारही दिले नसल्याचे ग्राहकांना सांगितले.

त्यांनतर बँकेचे मॅनेजर मल्लारी सूर्यवंशी यांना दूरध्वनी मार्फत संपर्क करण्याचा प्रयत्न केला, असता कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अनेक ग्राहक आर्थिक अडचणीत आले आहेत. परिणामी, बँकेच्या व्यवस्थापनावर कडक कारवाई व्हावी, यासाठी खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. या तक्रारीत आमचे पैसे मिळून द्यावे, अशी मागणी करण्यात आली असून याबाबत चौकशी सुरू आहे. लवकरच दोषींवर कारवाई होईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी दिली आहे. मात्र या बँकेचे व्यवस्थापन अधिकारी मल्लारी सर्यवंशी यांच्याशी दूरध्वनी मार्फत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद दिला नाही.

Exit mobile version