जि.प.प्रशासन सरसावले
कार्यशाळेत मान्यवरांचे मार्गदर्शन
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
घनकचरा व्यवस्थापन ही ग्रामीण भागातील मोठी समस्या असून, ही समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने आश्वासक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी (दि.18) जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छ्ता मिशन अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन विषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी रायगडला घनकचरा मुक्त करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.
या कार्यशाळेत घनकचरा वर्गीकरण, संकलन, प्रक्रिया तसेच सांडपाणी व्यवस्थापन कसे करावे, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, विविध कंपन्यांच्या सीएसआर विभागाचे प्रतिनिधी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
घनकचरा बाबत जनतेमध्ये प्रबोधन करणे गरजेचे असून, कचर्याचे वर्गीकरण, कचरा संकलन तसेच प्रक्रिया याबाबत ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. याकामी विविध कंपन्यांच्या सीएसआर विभागाने आपल्या विकास निधी ग्रामपंचायतीना देऊन, घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास मदत करावी, सांडपाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी शोषखड्डे व परसबागा निर्माण कराव्यात.
डॉ. किरण पाटील ,सीईओ,झेडपी
या कार्यशाळेत पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानादा फणसे यांनी घनकचरा वर्गीकरण तसेच त्याच्यावर प्रक्रिया करणे किती गरजेचे आहे याचे महत्त्व सांगितले. स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी कचर्यामुळे होणारे प्रदूषण तसेच कचर्याच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत माहिती दिली. जेएसडब्ल्यू कंपनीचे सीएसआर प्रतिनिधी श्री. दळवी यांनी कंपनी घनकचरा प्रश्ना बाबत करीत असलेल्या कामाबाबत माहिती दिली. तर लांन्स प्रतिष्ठानचे साई खानोलकर यांनी घनकचरा प्रकल्प कसा उभारावा व त्याची प्रक्रिया कशी चालते याबाबत माहिती दिली.
वसुंधरा अंतर्गत ल्लेखनीय काम
स्वच्छता व पर्यावरण स्नेही बाबींच्या अंमलबजावणीसाठी माझी वसुंधरा मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील 411 ग्रामपंचायतीने रजिस्ट्रेशन केले असून, राज्यात माझी वसुंधरा अंतर्गत सर्वात जास्त रजिस्ट्रेशन हे रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी केले आहे. वसुंधरा अंतर्गत विविध झाडे लावून पर्यावरणाचे रक्षण करण्यासोबतच सांडपाणी, घनकचरा, शौचालय, सौरऊर्जा याबाबत काम करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती डॉ. किरण पाटील यांनी दिली.