स्वच्छतेत ‘रायगड’ अव्वल राहणार

सरपंच, स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केला मनोदय

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्हा स्वच्छतेबाबत राज्यात अव्वल क्रमांकावर राहील, असा मनोदय ग्रामपंचायत सरपंच व स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केला. निमित्त होते ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत शुक्रवारी (ता.30) आयोजित करण्यात आलेल्या सरपंच व स्वयंसेवी संस्थांच्या संवाद कार्यक्रमाचे. यावेळी ग्रामपंचायतींनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन याकडे शासकीय योजना म्हणून न पाहता लोकचळवळ म्हणून पाहिल्यास प्रत्येक ग्रामपंचायत आदर्श व स्वच्छ, सुंदर होईल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत सरपंच व स्वयंसेवी संस्थांसाठी संवाद कार्यक्रम जिल्हा परिषद कै. ना.ना. पाटील सभगृहात संपन्न झाला. यावेळी उपस्थित सरपंच व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी संवाद साधला. घरगुती कचरा व्यवस्थापनाबरोबर सार्वजनिक स्तरावरील कचरा व्यवस्थापन अत्यंत गरजेचे आहे. गावपातळीवरील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे घेण्यासाठी जागा निश्‍चितीबरोबरच गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामासाठी दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हा परिषदेच्या मार्फत घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छताविषयी राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था व मंडळे यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रमोद शिंदे सर, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, आकाश गायकवाड, श्री. सकपाळ उपस्थित होते.

ग्रामीण विकासाचा पाया महिला बचत गट असून, सरपंच, ग्रामसेवक यांच्यासोबत स्वयंसेवी संस्था व बचत गटातील महिलांनी सक्रीय सहभाग घेतल्यास ही चळवळ यशस्वी होईल.

डॉ. किरण पाटील
मुख्य कार्यकारी अधिकारी
Exit mobile version