शारीरिक चाचणी पूर्ण, आता लेखी परीक्षेची प्रतीक्षा
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
रायगड जिल्ह्यातील होमगार्ड भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच पोलिसांच्या मदतीसाठी रायगड जिल्ह्याला नवे होमगार्ड मिळणार आहेत.
जिल्ह्यातील रिक्त असलेल्या होमगार्ड जवानांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 313 जागांसाठी 26 जुलैपासून 16 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. या कालावधीत चार हजार 98 अर्ज दाखल झाले. त्यात तीन हजार 208 पुरुष व 890 महिलांचा समावेश आहे. छाननीनंतर दीड हजार उमेदवारांची प्रत्यक्षात शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये एक हजार 189 पुरुष व 318 महिला उमेदवारांनी सहभाग घेतला. 29 ऑगस्ट ते 1 सप्टेेंबर या कालावधीत धावणे, गोळा फेक आदी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
आपत्कालीन कालावधीत तसेच वेगवेगळया ठिकाणी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड जवान काम करतात. जिल्ह्यात होणार्या होमगार्डच्या भरतीनंतर रायगड जिल्ह्याला 313 नवे होमगार्ड मिळणार आहे. या होमगार्डच्या मदतीने जिल्ह्यातील आगामी सण, उत्सव तसेच मोर्चे, आंदोलने अशा ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची मदत होण्याची शक्यता आहे.
निवड यादी दोन दिवसांत लागणार
रायगड जिल्ह्यात होमगार्ड भरतीसाठी मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाले आहेत. शारीरिक चाचणीदेखील झाली आहे. दोन दिवसांनंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल. होमगार्डचे प्रशिक्षण 35 दिवसांचे असून, त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मागणीनुसार नियुक्त केले जाणार असल्याची माहिती होमगार्ड कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
होमगार्डवर दृष्टीक्षेप
लक्षांक - 900
पटावर असलेले - 551
भरती होणारे - 313







