रायगडचा कैडेंस क्रिकेट अकॅडमीवर विजय

ऋणालचे 7 बळी, आरवचे अर्धशतक

। रायगड । क्रीडा प्रतिनिधी ।

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निमंत्रित आंतरजिल्हा चौदा वर्षाखालील मुलांच्या दोन दिवसीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघाने महाराष्ट्रातील सर्वात नामांकित व बलाढ्य क्रिकेट अकॅडमी म्हणून ओळख असलेल्या कैडेंस क्रिकेट अकॅडमी, पुणे संघावर वर पहिल्या डावाच्या आघाडीवर दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला आहे.

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या चौदा वर्षाखालील मुलांच्या संघाने साखळी फेरीत चमकदार कामगिरी करत सुपर लिगच्या सामन्यांसाठी पात्रता मिळवल्याच्या नंतर सुपर लिग मध्ये सुद्धा दमदार कामगिरी सुरू ठेवली असून, पुणे, चांदखेड येथील थर्टीयार्ड क्रिकेट मैदानावर रायगड विरुद्ध कैडेंस क्रिकेट अकॅडमी ह्या संघांमध्ये सुपर लिग फेरीतील सामना झाला. त्यामध्ये प्रथम फलंदाजीला करतांना कैडेंस क्रिकेट अकॅडमी संघाला रायगडच्या गोलंदाजी पुढे हात टेकावे लागले, रायगडचा अष्टपैलू खेळाडू व जलदगती गोलंदाज ऋणाल गिजे यांनी कैडेंसच्या 7 फलंदाजांना बाद करत संघाचा डाव अवघ्या 122 धावांवर रोखला.

रायगडच्या संघाने पहिल्या डावात सर्व गडी बाद 209 धावसंख्या उभारली. त्यामध्ये रायगडच्या संघाचा सलामीवीर तंत्र शुद्ध फलंदाज आरव बरळ यांनी 52 धावांची अर्धशतकीय खेळी करत संघाला पहिल्या डावाची आघाडी मिळवून दिली. त्याला दुसऱ्या बाजूने कर्णधार देव सिंह यांनी मूल्यवान 37 धावा काढून साथ दिली. रायगडच्या संघाने पहिल्या डावात 87 धावांची भक्कम आघाडी घेत सामन्यावर पकड घेतली. दुसऱ्या डावात कैडेंसच्या संघाने संयमी फलंदाजी करत 2 गडी बाद 224 धावा केल्या. त्यामध्ये विरेंन अटोळे यांनी 115 धावा काढून शतक झळकले तर भाव्यराजे भोसले यांनी नाबाद 52 धावांची खेळी केली. 224 धावांवर डाव घोषित केल्या नंतर रायगडच्या संघासमोर जिंकण्यासाठी 137 धावांचे लक्ष ठेवले होते. दुसऱ्या दिवसी खेळ संपला तेव्हा रायगडच्या संघाचा डाव 4 गडी बाद 56 धावांवर रोखण्यात आला. सामना अनिर्णित राहिला असला तरी रायगडच्या संघाने पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला आहे.

रायगडच्या संघाच्या दमदार कामगिरी बद्दल जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदिप नाईक यांनी संघातील सर्व खेळाडूंना तसेच प्रशिक्षक सागर कांबळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील युवा खेळाडूंमध्ये चांगला खेळ करण्याची क्षमता व गुणवत्ता असून त्यांना क्रिकेट खेळासाठी चांगल्या दर्जाच्या सुविधा व जास्तीतजास्त मॅचेसचे आयोजन करून देण्यासाठी आपला प्रयत्न असणार आहे. तसेच, रायगड जिल्ह्यातील ज्युनिअर वयोगटातील सामने भविष्यात दोन दिवसांचे करण्याचा विचार आरडीसीए कमिटी करणार असल्याचे देखील अनिरुद्ध पाटील यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.

Exit mobile version