| रसायनी | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद यांनी टाटा स्टील फ्रेंडशिप कप क्रिकेट टूर्नामेंट जिंकताना रायगड पोलीस अधीक्षक संघाला हरविले आहे. खालापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप कराड यांनी रायगड संघाचे नेतृत्व केले.
खालापूर तालुक्यातील टाटा स्टील कंपनीने शासकीय अधिकारी, कर्मचारी व पोलीस यांच्यासाठी टाटा स्टील फ्रेंडशिप क्रिकेट चषक या स्पर्धेचे आयोजन सावरोली येथील टाटा स्टील टाउनशिप येथे केले होते. या स्पर्धेत रायगड जिल्हा परिषद, रायगड पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी सहभाग घेतला होता. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन खालापूर तहसिलदार अभय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार व गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी केले. यावेळी टाटा स्टीलचे शशी भूषण, एन.सी. महापात्रा, आशिष सोळुंखी, सौरभ शर्मा व भावेश रावल उपस्थित होते.
यावेळी अंतिम सामना रायगड जिल्हा परिषद आणि रायगड पोलीस अधीक्षक यांच्यात पार पडला. रायगड पोलीसांनी प्रथम फलंदाजी करत 15 षटकांत 7 गडी गमावून 167 धावा केल्या. उत्तरादाखल मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषदेने मात्र 9 षटकांमध्ये 1 गडी गमावत 168 धावा ठोकल्या आणि टाटा स्टील फ्रेंडशिप चषक क्रिकेट स्पर्धेवर नाव कोरले. यावेळी सर्वोत्तम गोलंदाज पोलिस अधीक्षक कार्यालयाचे नितीन सांगळे, तर सर्वोत्तम फलंदाज मुख्य कार्यकारी अधिकारी राजिपचे किरण डोंगरे हे ठरले.
राजिपने जिंकला फ्रेंडशिप कप
