रायगडकर अनुभवणार शून्य सावली

14 मे रोजी अलिबाग तर 15 मे रोजी कर्जत आणि माथेरानकरांना पर्वणी

। रायगड । प्रतिनिधी ।

कुतूहल लागून असलेला शून्य सावली दिवस रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे (दि.14) मे, कर्जत, माथेरान (दि.15) मे अनुभवता येणार आहे. आपल्या सोबत वर्षभर राहणारी सावली या दिवशी काही मिनिटासाठी आपली साथ सोडून जाणार आहे. भौगोलिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या हे दिवस महत्त्वाचे असून, विद्यार्थी व नागरिकांनी भौगोलिक घटनांचा अभ्यास, निरीक्षण करावे, असे आवाहन खगोल अभ्यासकांनी केले आहे.

सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50 दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान असणार्‍या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शुन्य सावली दिवस येतात. उत्तरायण आणि दक्षिणायन होताना ही स्थिती राहते. सूर्य दररोज 0.50 सरकतो. सूर्य क्रांती पृथ्वीवरील स्थळाशी समान कोन करते, तेव्हा सूर्य माध्यान्हाचे वेळी नेमका डोक्यावर आल्याने आपली सावली काही क्षणासाठी नाहिशी होते. उन्हाळ्यातील त्या शून्य सावली दिवसाला अधिक महत्त्व आहे. या कालावधीत या अनोख्या घटनेचा प्रारंभ दक्षिणेकडून उत्तरेकडे संबंधित शहराच्या जवळच्या भागात दुपारी 12 ते 12.30 या वेळेत घेता येईल. ही वेळ पूर्वेस कमी व पश्‍चिमेस वाढलेली असणार आहे.

अंदमान-निकोबार बेटावर इंदिरा पॉइंट येथे (दि.6) एप्रिल आणि (दि.5) सप्टेंबर रोजी दुपारी सूर्य अगदी डोक्यावर येतो आणि शून्य सावली अनुभवता येतो. (दि.10) एप्रिल आणि (दि.1) सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथे शून्य सावली दिवस असतो. दक्षिण भारतात तेलंगणा येथे (दि.2) मेपर्यंत विविध अक्षवृत्तांवर असलेल्या शहरात शून्य सावली दिवस पाहता येतो. शेवटी भोपाळजवळ (दि.18) जून रोजी शून्य सावली दिवस पाहता येतो. लगेच दक्षिणायन सुरू होताच पुन्हा भोपाळ ते अंदमानपर्यंत पुन्हा पावसाळ्यात शून्य सावली दिवस येतात. परंतु ढग आणि पाऊस असल्याने हे दिवस अनुभवता येत नाहीत.

कसे कराल निरीक्षण
दुपारी 12 ते 12.35 या वेळेदरम्यान सूर्य निरीक्षण करावे. समूहासाठी उपक्रम करायचा असेल तर मोकळ्या जागी आणि कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात केले तरी चालेल. साहित्य - दोन, तीन इंच व्यासाचा, एक दोन फूट उंचीचा पोकळ प्लास्टिक पाईप, कोणतीही उभी वस्तू ठेवावी किंवा स्वता उन्हात सरळ उभे रहावे. सूर्य अगदी डोक्यावर आला की सावली दिसत नाही. सावलीने थोडा वेळ का होईना साथ सोडलेली असेल. हे प्रत्यक्षदर्शी पाहता येणार आहे.
शून्य सावली दिवस
13 - पुणे, मुळशी, दौंड, लातूर, लवासा, 14 - लोणावळा, अलिबाग, दाभाडे, पिंपरी-चिंचवड, देहू, जामखेड, आंबेजोगाई, 15 - मुंबई , नवी मुंबई, कर्जत, बीड, माथेरान, राळेगण सिद्दी, सिरोंचा, 16 - बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, बदलापूर, नारायण गाव, खोडद, अहमदनगर, परभणी, नांदेड, निर्मल, 17 - नालासोपारा, विरार,आसनगाव, अहेरी, आल्लापल्ली, 18 - पालघर, कसारा, संगमनेर, अंबाड, हिंगोली, मूलचेरा, 19 - छत्रपती संभाजी नगर, डहाणू, नाशिक, कोपरगाव, वैजापूर, जालना, पुसद, बल्लारशा, चामोर्शी, 20 - चंद्रपुर, मेहकर, वाशीम, वणी, मूल, 21 - मनमाड, चिखली, गडचिरोली, सिंदेवाही, रोहना, 22 - मालेगाव, चाळीसगाव, बुलढाणा, खोपोली, यवतमाळ, आरमोरी, 23 - खामगाव, अकोला, देसाईगंज, ब्रम्हपुरी, नागभीड - धुळे, जामनेर, शेगाव, वर्धा, उमरेड, दर्यापूर, 25 - जळगाव, भुसावळ, अमरावती, अंमळनेर, तेल्हारा, 26 - नागपूर, भंडारा, परतवाडा, चोपडा - नंदुरबार, शिरपुर, बुर्‍हाणपूर, परतवाडा, चिखलदरा, तुमसर, गोंदिया, सावनेर, काटोल, रामटेक - अक्कलकुआ, शहादा, पांढुरणा, वरुड, नरखेड - बोराड, नर्मदा नगर, 30 - धाडगाव, 31 - तोरणमाळ


Exit mobile version