| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्हा परिषद स्वच्छता व पाणी मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्यांच्या योजनांच्या स्त्रोतांची जैविक तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील एक हजार 830 गावांपैकी एक हजार 403 गावांची तपासणी करून चार हजार 43 ठिकाणी पाण्याचे नमुने तपासण्यात आले. या तपासणीत 23 गावांमधील 36 ठिकाणी पाण्याचे नमुने दूषित असल्याचे आढळून आले. त्यामध्ये अलिबाग, महाड, मुरूड, पनवेल, पेण, पोलादपूर, रोहा, व उरण या तालुक्यातील गावांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक दूषित पाणी पित असल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले आहे.
जिल्ह्यात पाऊस समाधानकारक पडला आहे. या पावसामुळे धरणे, विहीरी, पाण्याने तुडूंब भरली आहेत. रायगड पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 28 धरणांपैकी सुतारवाडी, पाभरे, संदेरी, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, वरंध, कोंडगांव, उन्हेरे, कवेळे, भिलवले, वावा, फणसाड, घोटवडे, कोलतो- मोकाशी डोणवत या 16 धरणांमध्ये शंभर टक्के जलसाठा आहे. कार्ले, अवसरे, बामणोली, उसरण, या धरणांमध्ये 75 टक्के. कुडकी, आंबेघर या दोन धरणांमध्ये 99 टक्के आणि श्रीगांव, ढोकशेत, साळोख, मोरबे, पुनाडे, रानीवली या सहा धरणांमध्ये 50 टक्क्यांपर्यंत जलसाठा असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातही मोठ्या प्रमाणात पाण्याचासाठा आहे.
जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास, गाढी या नद्यांही पाण्याने भरल्या आहेत. इशारा पातळीपेक्षा या नद्यांमध्ये पाणी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कोलाड येथील लघुपाट बंधारे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अखत्यारित असलेल्या धरणांमधून जिल्हयातील नागरिकांना पाणी पूरवठा केला जातो. धरणे पाण्याने भरल्याने पाणीही मूबलक मिळत आहे. पाणी कपातीचे संकट दूर झाले आहे. मात्र, पावसामुळे धरणांमधील पाणी माती मिश्रीत व गढूळ झाले आहे. काही धरणांमध्ये जलशुध्दीकरण केंद्र असूनही नागरिकांना अशुध्द पाणी मिळत आहेत. काही धरणांमध्ये जलशुध्दीकरण केंद्राचे काम अपूर्ण स्थितीत असल्याने पाणीशुध्दीकरणाची पावडर टाकून शुध्द पाणी देण्याचा प्रयत्न केला जातो. तरीदेखील नळा द्वारे येणारे पाणी हे गढूळ असल्याचे दिसून आले. त्यामुळे रायगकरांना गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे.
जिल्हा परिषद स्वच्छता व पाणी मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्यांच्या योजनांच्या स्त्रोतांची जैविक तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील एक हजार 830 गावांपैकी एक हजार 403 गावांची तपासणी करून चार हजार 43 ठिकाणी पाण्याचे नमुने तपासण्यात आले. या तपासणीत 23 गावांमधील 36 ठिकाणी पाण्याचे नमुने दूषित असल्याचे आढळून आले. त्यामध्ये अलिबाग, महाड, मुरूड, पनवेल, पेण, पोलादपूर, रोहा, व उरण या तालुक्यातील गावांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक दूषित पाणी पित असल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले आहे.
उपाययोजना करण्याच्या सुचना
जिल्ह्यातील 23 गावांमधील 36 ठिकाणी पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. या गावांतील दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार होऊ नये, म्हणून उपाययोजना करण्याच्या सुचना ग्रामपंचायतींना केल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही ग्रामपंचायतींकडून करण्यात आल्याची सांगण्यात आले आहे.
जिल्हा परिषद अखत्यारित असलेल्या धरणांमधून पावसामुळे दूषित पाणी मिळत आहे. टीसीएल पावडरसह पाणी उकळून पिण्याच्या सुचना नागरिकांना देण्यासाठी ग्रामपंचायतींना पत्र देऊन कळविण्यात आले आहे.
संजय वेंगुर्लेकर
कार्यकारी अभियंता
ग्रामीण पाणी पुरवठा, रायगड जिल्हा परिषद