रायगडकरांना पावसाची प्रतिक्षा

28 धरणांमध्ये 23 टक्केच पाणीसाठा

| अलिबाग | प्रतिनिधी |

राज्यात मान्सून येऊन एक आठवडा लोटला आहे. मात्र म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाही. त्यामुळे नागरिकांसह, शेतकरी चिंतातुर झाला आहे. रायगड जिल्ह्यातील 28 धरणात 23.15 टक्के जलसाठा शिल्लक आहे. 9 धरणात दहा टक्क्यांहून कमी पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे पावसाने अशीच दडी मारल्यास जिल्ह्यातील पाणी प्रश्‍न पेटण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यात मुरुड (1), तळा (1), रोहा (1), पेण (1), अलिबाग (1), सुधागड (5), श्रीवर्धन (3), म्हसळा (2), महाड (4), कर्जत (2), खालापूर (3), पनवेल (3), उरण (1) या तेरा तालुक्यात 28 धरणे बांधली गेली आहेत. या धरणातून जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. जिल्ह्यातील 28 धरणात 68.261 दलघमी पाण्याच्या साठ्याची क्षमता आहे. मात्र सध्या या धरणांमध्ये केवळ 23 टक्के पाणी साठा शिल्लक राहीला आहे. चिंताजनक बाब म्हणजे यातील 9 धरणांमध्ये दहा टक्क्याहून कमी पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे या धरणांच्या पाण्यावरअवलंबून असलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. गेल्यावर्षी रायगड जिल्हयात पाऊस सरासरी इतका झाला होता. धरण परिसरात चांगला पाऊस पडल्याने सर्व धरणे ही शंभर टक्के भरली होती. परंतु मार्च महिन्यातच धरणातील पाणीपातळी खाली जाण्यास सुरुवात झाली. सध्याचा धरणातील पाणीसाठा पाहता, पावसाला उशीर झाला तर पाणी समस्या गंभीर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. नागरिकांची पाण्यासाठी पायपीट होणार आहे.

किती टक्के पाणी शिल्लक
जिल्ह्यात सध्या 28 धरणात 15.804 दलघमी पाणी साठा शिल्लक आहे. म्हणजे 23.15 टक्केच पाणी साठी शिल्लक आहे. पावसाने दडी दिल्यास ही परिस्थिती अधिकच उग्र रुप धारण करण्याची शक्यता आहे.
उपलब्ध पाणीसाठा
0 ते 10 टक्के फणसाड, श्रीगाव, कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, कोथुर्डे, उन्हेरे, अवसरे, डोणवत धरणात 0 त 10 टक्केच पाणी शिल्लक आहे. सुतारवाडी, कवेळे, रानवली, पाभरे, खैरे, साळोख, भिलवले, कलोते-मोकाशी, पुनाडे यएथील धरणांमध्ये 11 ते 30 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे तर31 ते 50 टक्के पाणी हे वावा, कार्ले, वरंध, मोरबे, बामणोली या धरणात आहे. समाधानाची बाब म्हणजे 51 ते 60 टक्के पाणी हे आंबेघर, कुडकी, संदेरी, उसरण येथील धरणात आहे.
Exit mobile version