बागायतदार वरूण पाटील यांनी मिळवला मान
| पाली/बेणसे | धम्मशील सावंत |
कोकणच्या हापूस आंब्याचा रंग, सुगंध आणि अविट गोडी आणि चवीची भुरळ संपूर्ण जगातील खवय्यांना आहे. फळांचा राजा असलेल्या याच आंब्याची प्रतीक्षा आता संपली आहे. खवय्यांना आनंदाची बातमी असून, रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नारंगी गावचे आंबा बागायतदार वरुण पाटील यांच्या रोहा वर्हाटी येथील बागायतीमधील पहिला हापूस आणि केशर जातीच्या आंब्याच्या पहिल्या पेट्या मुंबई बाजारात मंगळवारी दाखल झाल्या आहेत. हापूसच्या चार पेट्या आणि केशर जातीची एक पेटी वाशी बाजारात मंगळवारी दाखल झाली आहे.
![](http://krushival.in/grygrars/2025/01/20250128_133743-1024x473.jpg)
रायगड जिल्ह्यातदेखील हापूस आंब्याचे पीक भरघोस व मोठ्या प्रमाणावर येते. अलिबाग, रोहा, पेण, श्रीवर्धन, म्हसळा आदी तालुक्यांत हापूस आंब्याचे पीक चांगले मिळते. रायगडच्या हापूस आंब्याची गुणवत्ता व चव अप्रतिम असल्याने येथील आंब्याला बाजारात मोठी मागणी आहे.
तरुण आंबा बागायतदार वरुण पाटील हे बाजारात आंब्याची पहिली पेटी नेण्यात अग्रगण्य ठरले आहेत. तब्बल 45 एकर जागेवर त्यांनी आंबा बागायत केली असून, वर्षभर केलेल्या मेहनतीचे गोड फळ त्यांना जानेवारीपासून मिळायला सुरुवात होते. दरवर्षी आपल्या बागेतून किमान 40 हजार डझन आंबे ते बाजारात नेतात. यावर्षीची पहिली आंबा पेटी बाजारात नेण्याचा बहुमान पुन्हा वरुण पाटील यांना मिळाला आहे.
वरुण पाटील म्हणाले की, यंदा पाऊस उशिरापर्यंत होता तरीदेखील जानेवारीमध्ये उत्पादन मिळाले. यामागे खत व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन योग्यरित्या केल्याने ते शक्य झाले आहे. बाजारात परराज्यातील आंबा हापूसच्या नावाने विकला जातो, यामध्ये ग्राहकांची फसवणूक होते, त्यामुळे खात्रीशीर विक्रेत्याकडून आंबे घेणे, अथवा मानांकन तपासूनच आंबे खरेदी करणे, ही पद्धती अवलंबून व्यवहार करणे हिताचे ठरेल, असे वरुण पाटील म्हणाले.
पाच हजार रुपये डझन
रायगडचा हापूस आता बाजारात भाव खाणार आहे. डझनाला पाच हजार रुपये दर मिळेल, अशी माहिती आंबा बागायतदार वरुण पाटील यांनी दिली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही रायगडाच्या हापूस आंब्याची पेटी बाजारात नेणारे वरुण पाटील हे पहिले मानकरी ठरले आहेत. बागायतीमधून काढलेल्या आंब्याची कुटुंबाने मनोभावे पूजा करून आंबा पेट्या बाजारात रवाना केल्या आहेत.
कोकणातील हापूस आंब्याचा सुगंध विशिष्ट असतो, तर इतर आंब्याच्या तुलनेत हापूसचा गोडवा अधिक असतो. हवामानातील बदल व बदलत्या वातावरणातही जानेवारी महिन्यात आंबा पेटी बाजारात पाठवणे ही मोठी गोष्ट आहे, याकामी मला माझे कुटुंब, हितचिंतक व मित्रपरिवार यांची मदत होत आहे.
वरुण पाटील,
आंबा बागायतदार