रायगडचा कुमार संघ उपांत्यपूर्व फेरीत

| ठाणे | प्रतिनिधी |

कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी उपउपांत्य पूर्व फेरीत कुमार गटात झालेल्या सामन्यात रायगड संघाने जालना संघावर 37-29 अशी मात करीत विजय मिळविला. मध्यंतराला मंथन मराठे, निरज मिसाळ यांनी आपल्या खोलवर केलेल्या चढायांमुळे जालन्याचा बचाव खिळखिळा केला व विजय मिळविला. तर राज मोरे व अनुज पवार यांनी चांगल्या पकडी घेतल्या. जालन्याच्या विरेंद्र मंडलिक, अनिकेत नागवे यांनी चांगला खेळ केला. ओमराज उखरदे व कृष्णा राठोड यांनी पकडी घेतल्या.

मुंबई उपनगर पश्चिम संघाने ठाणे ग्रामीण संघावर 38-36 असा निसटता विजय मिळविला. मध्यंतराला मुंबई उपनगर पश्चिम संघ 15-19 असा पिछाडीवर होता. मुंबई उपनगर पश्चिम संघाच्या रजत सिंग याने आक्रमक खेळ केला. तर अभिजित वधावल यांनी चांगल्या पकडी केल्या. ठाणे ग्रामीण संघाच्या दिव्येश पाटील याने आक्रमक खेळ केला. तर क्षितीज ठोंबरे याने चांगल्या पकडी घेतल्या. मुंबई उपनगर पूर्व संघाने ठाणे शहर संघावर 28-19 अशी मात करीत विजय मिळविला. मध्यंतराला उपनगर पूर्व संघाकडे 16-7 अशी आघाडी होती. उपनगर पूर्वच्या प्रसाद पानसरे याने चौफेर चढाया करीत विजयात मोलाचा वाटा उचलला. रुपेश जाधव याने उत्कृष्ट पकडी घेतल्या. ठाणे शहर संघाच्या सुजल जाधव याने जोरदार प्रतिकार केला. तर पियुष तिवारी याने चांगल्या पकडी घेतल्या.

कुमारी विभागात पहिल्या उपउपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात पिंपरी चिंचवड संघाने धुळे संघावर 42-22 अशी मात केली. मध्यंतराला पिंपरी चिंचवड संघाकडे 27-5 अशी आघाडी होती. पिंपरी चिंचवडच्या मनिषा राठोड हिने चौफेर हल्ला करीत धुळे संघाचा बचाव भेदत संघाला सहज विजय मिळवून दिला. आर्या पाटीलने सुरेख पकडी घेत चांगली साथ दिली. धुळे संघाच्या रक्षा जाधव हिने काहीसा प्रतिकार केला. तर साक्षी पाटील हिने पकडी केल्या. दुसऱ्या सामन्यात मुंबई उपनगर पूर्व संघाने ठाणे ग्रामीण संघावर 52-20 असा एकतर्फी विजय मिळविला. उपनगर पूर्वच्या हरजीतकौर संधू व यशिका पुजारी यांनी जोरदार आक्रमक करीत आपल्या नावलौकिकास साजेसा खेळ करीत एकतर्फी विजय मिळविला. मधुरा सावंत व संजया पाल यांनी चांगल्या पकडी घेतल्या. ठाणे ग्रामीण संघाच्या निधी राजोले व सानिया गायकवाड यांनी चांगला खेळ केला. मात्र, त्यांना उपनगर पूर्वचा बचाव भेदता आला नाही. वृषाली जळगावकर हिने पकडी घेतल्या. तिसऱ्या सामन्यात सांगली संघाने मुंबई शहर पश्चिम संघावर 42-39 असा निसटता विजय मिळविला. मध्यंतराला सांगली संघाकडे 24-23 अशी निसटती आघाडी होती. सांगलीच्या श्रध्दा माळी व ऋतुजा अंबी यांनी जोरदार आक्रमण करीत विजय खेचून आणला. तर अनुजा शिंदे व किरण तोडकर यांनी चांगल्या पकडी घेतल्या, त्यामुळे विजय मिळविणे शक्य झाले. शहर पश्चिम संघाच्या रिया मडकयिकर व समृध्दी यांनी जोरदार खेळ केला. मात्र, त्यांना विजय मिळविण्यात अपयश आले.

Exit mobile version