उत्तम मांदारे यांची राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड
| कोर्लई | वार्ताहर |
म्हसळा तालुक्यातील खरसई येथील रायगड जिल्हा प्राथमिक शाळेतील योगशिक्षक उत्तम मांदारे यांची महाराष्ट्रातून राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सबज्युनिअर व ज्युनिअर योगासन स्पोर्ट्स चॅम्पियन स्पर्धा पंजाब-जालंधर येथील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये दि.18 ते दि.20 डिसेंबर रोजी पार पडणार आहेत. गेली अनेक वर्षे उत्तम मांदारे रायगड जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये सचिव म्हणून काम पाहात आहेत, तसेच गुरूकूल आरोग्य योगपीठ (खरसई)चे प्रभावी मार्गदर्शकही आहेत. प्रत्येक वेळी तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीयस्तरावर शालेय स्पर्धा व असोसिएशनमार्फत स्पर्धांसाठी पंच व मार्गदर्शन म्हणून नेहमी कसोटीने उत्तम प्रकारे काम पाहतात. त्यांच्या अष्टपैलू कामगिरीची नोंद राष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन त्यांची या कामगिरीबद्दल राष्ट्रीय योगासन स्पर्धेत पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.
खरसई गावातील सोमजाई माता क्रीडा मंडळाचे संस्थापक चंद्रकांत खोत, अध्यक्ष काशिनाथ पयेर, सदस्य काशिनाथ कोकाटे, रामचंद्र मांदारे, परशुराम मांदाडकर, माजी सरपंच निलेश मांदाडकर यांच्यासह म्हसळा तालुका क्रीडा समिती समन्वयक हलसंगी, अध्यक्ष डावखर, उपाध्यक्ष कांबळेकर, सेक्रेटरी प्रफुल्ल पाटील, क्रीडा शिक्षक हनुमंत मोरे, प्रसिद्धी प्रमुख अंगत कांबळे, बेटकर यांनी उत्तम मांदारे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.