रायगडच्या तीन सुपुत्रांचा दुबईत गौरव

डॉ. संतोष, प्रितीश, नरेंद्र एक्सेप्शनल अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित
| पाताळगंगा | वार्ताहर |

संगीत, आरोग्य आणि अध्यात्म अशा त्रिवेणी संगमात काम करणारे डॉ. संतोष बोराडे, प्रितीश चौधरी व नरेंद्र भोईर या तिघांना नुकत्याच झालेल्या दुबई येथील कार्यक्रमात ‘एक्सेप्शनल अचिव्हमेंट अवॉर्ड 2022 (संगीत विभाग) ’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रत्नधाव फाऊंडेशन आयोजित दुबई येथील इंटरनेट सिटी येथे हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमासाठी भारतासह दुबई येथील विविध मान्यवर, विविध विभागांतील प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, व्यावसायिक व साहित्यिक उपस्थित होते.

रत्नधाव फाऊंडेशन, महालँड ग्रुप्स आणि सफिर कॉर्पोरेट सर्व्हिस प्रोव्हायडर एल.एल.सी. यांच्या माध्यमातून डॉ. बबन जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. संगीत आणि आरोग्य क्षेत्रातून व्यापक समाजहिताचा विचार मांडणारे डॉ. संतोष बोराडे (कलोते), प्रितीश चौधरी (चौक) व नरेंद्र भोईर (लोधिवली) यांना या कार्यक्रमात त्यांच्या विशेष कामगिरीसाठी गौरवण्यात आले.

आपल्या ‘जीवनसंगीत’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे त्रिकुट महाराष्ट्रासह हिंदी, कानडी, उडिया, गुजराती, पंजाबी, बंगाली अशा विविध भाषिक लोकांसमोर आनंदी जगण्याचा एक प्रभावी उपाय मांडत आहेत. भारतातील विविध राज्यांबरोबरच आता त्यांच्या कामाची दखल विदेशातही घेतली जात असताना, मराठी मातीत जन्मलेल्या या हिर्‍यांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी समाजाच्या विविध स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Exit mobile version