रायगडच्या पर्यटनस्थळांचा चलचित्रफितीतून जगात प्रसार

पर्यटन व्यवसायाला मिळणार नवीन आयाम

| रायगड | खास प्रतिनिधी |

जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी एक चलचित्रफित तयार केली आहे. सदरच्या चल चित्रफितीचा शुभारंभ लवकरच होणार आहे. त्यानंतर सर्व समाज माध्यमांच्या सहायाने त्याचा प्रसार करण्यात येणार आहे. पर्यटन व्यवसायाला नवीन आयाम देऊन स्थानिक पातळीवरील रोजगाराच्या संधी गतीमान करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

जिल्ह्यामध्ये विविध धार्मिक मंदिर, ऐतिहासिक गड-किल्ले, बौद्ध कालीन लेण्या, स्वच्छ आणि निसर्गरम्य समुद्र किनारे लाभले आहेत. रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा ओढा अलिकडे वाढला आहे. पर्यटन वृध्दीसाठी लागणारे सर्व घटक निसर्गाने जिल्ह्याला बहाल केले आहेत. मात्र त्याचा म्हणावा तसा वापर करण्यात रायगडवासीय, सरकार आणि प्रशासन कमी पडत आहेत.

गोवा, केरळ, राजस्थान या राज्यांसह मॉरिशस, मालदिव,बाली, बँकाक यासह अन्य देशांनी पर्यटन व्यवसायामध्ये अतिशय चांगली प्रगती केली आहे. या ठिकाणी पर्यटनातील उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा, सुरक्षा तेथील सरकार आणि प्रशासनाने उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटक तेथे भेट देतात. त्यामुळे तेथील पर्यटन व्यवसाय बहरला आहे. देशी तसेच विदेशी चलन प्राप्त होत असल्याने त्यांच्या अर्थव्यवस्थेला गती प्राप्त झाली आहे.

रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती सर्वदूर पोचावी. त्यामाध्यमातून पर्यटन व्यवसायात वाढ होऊन स्थानिकांना रोजगार मिळावा. यासाठी जिल्हा नियोजन समितीने कंबर कसली आहे. नाविण्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला यासाठी सुमारे 25 लाख रुपये देण्यात आले होते. जिल्ह्यातील ठराविक पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली आहे. त्या पर्यटन स्थळांची माहिती, इतिहासाबाबतची चलचित्रफित अन्नोम या संस्थेने तयार केली आहे. लवकरच त्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व समाज माध्यमांवर ती चलचित्रफित व्हायरल करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनीता गुरव यांनी कृषीवलशी बोलताना दिली.

या पर्यटनस्थळांचा समावेश
पाली, महड, कुलाबा किल्ला, रायगड किल्ला, पाचाड-जिजामाता समाधी, उमरठ, चवदार तळे, मुरुड-जंजिरा, काशिद समुद्र किनारा, घारापूरी लेणी, कोर्लई किल्ला, उंबरखिंड, सिध्दी घुमट, मांडवा जेटी, आक्षी शिलालेख, पद्मदुर्ग, कर्नाळा पक्षी अभयारण्य, फणसाड अभयारण्य, हरिहरेश्र्‌‍वर, सुवर्ण गणेश मंदिर, चिरनेर, करमरकर शिल्प, शिरढोण, रेवदंडा विनोबा भावे स्मारक, नागाव समुद्र किनारा.
Exit mobile version