| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानची राणी अर्थात मिनीट्रेनच्या सेवेत वाढ करण्याची मागणी पर्यटकांकडून करण्यात येत असताना रेल्वे प्रशासन कार्यवाहीबाबत ढिम्म असल्याचा आरोप होत आहे. पर्यटकांची आकर्षण असणारी मिनिट्रेन पावसाळी चार महिने सुट्टीवर जाते, त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांचा भ्रमनिरास होतो. दरम्यान, केवळ दोनच ट्रेन या नेरळ माथेरान मार्गावर धावत असल्याने असंख्य पर्यटकांना मर्यादित तिकिटांमुळे या सेवेचा लाभ मिळत नाही. इंजिन उपलब्ध नसल्याची कारणे पुढे करून अथवा स्टाफ नाही, बोग्यांची कमतरता अथवा तांत्रिक दुरुस्ती अशाप्रकारे सांगून अधिकारी वर्ग वेळ मारून नेत असल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वीच्या काळात मिनिट्रेनच्या पाच ते सहा फेऱ्या होत असत यामध्ये मालवाहू गाडीतून जीवनावश्यक साहित्य असो किंवा बांधकाम साहित्य हे नियमितपणे यायचे. इथल्या शटल सेवेला डबल इंजिन लावून शटलची सुविधा पुरविली जाते. घाटातून केवळ एका इंजिनच्या सहाय्याने पाच ते सहा बोग्या भरून प्रवासी येतात, मग अमन लॉज ते माथेरानदरम्यान घाट सेक्शन नसताना शटल साठी दोन इंजिनची आवश्यकता नाही. यातील काही इंजिन्स नेरळ माथेरान मार्गावर पर्यटकांच्या वाहतुकीसाठी ठेवल्यास असंख्य पर्यटकांना या सेवेचा लाभ घेता येईल. त्यासाठी अधिकारी वर्गाने पर्यटकांसाठी उन्हाळ्यातील आठ महिने ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून जोर धरू लागली आहे.







