रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन प्रवाशांच्या जीवावर

लोकलच्या अपघातात चौघांचा मृत्यू

| मुंबई | प्रतिनिधी |

ऐन गर्दीच्या संध्याकाळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आणि प्रवाशांना वेठीला धरले. कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन प्रवाशांच्या जीवावर बेतले आहे. लोकल अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ही भीषण दुर्घटना गुरुवारी घडली.

मुंब्रा रेल्वे अपघातप्रकरणी रेल्वेच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याच्या मुद्द्यावर रेल कामगार सेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. सीएसएमटी स्थानकावर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याने लोकलसेवा ठप्प झाली होती. त्यामुळे मुंबईच्या सर्व स्थानकांवर चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तेव्हा सीएसएमटी ते मस्जिद बंदरदरम्यान चार प्रवासी धावत्या लोकलमधून पडले, असे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी रुळावरून फास्ट लोकलने या प्रवाशांना उडवले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे राष्ट्रीय रेल्वे मजदूर संघाने आंदोलन केले असून, या आंदोलनात रेल्वे कर्मचारी सहभागी झाल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. संध्याकाळी सहा ते सात या कालावधीत सीएसएमटी स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. संध्याकाळी सहाच्या सुमारास मजदूर संघाच्यावतीने आंदोलनाला सुरूवात झाली. तासभर हे आंदोलन सुरू होते. यामुळे संध्याकाळी सहा ते सात या कालावधीत रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मध्य रेल्वेवरील वाहतूक ठप्प पडल्याने प्रवाशांचे हाल झाले. मध्य रेल्वेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, लोहमार्ग पोलिसांनी दोन अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याने गुरुवारी रेल्वे कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी स्थानकात आंदोलन केले. संध्याकाळी पावणे सात वाजता मध्य रेल्वेवरील वाहतूक पूर्ववत झाली आहे.

आंदोलन का केले?
मुंब्रा येथे 9 जून रोजी दुर्घटना घडली होती. यात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी चौकशी अहवालात रेल्वेच्या दोन अभियंत्यांवर ठपका ठेवण्यात आला होता. याविरोधात सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने आंदोलनाचा इशारा दिला होता. यानुसार गुरुवारी संध्याकाळी मजदूर संघाच्यावतीने सीएसएमटी स्थानकावर आंदोलन करण्यात आले.
Exit mobile version