नेरळचे रेल्वे फाटक टेम्पोने उडविले; वाहतूक विस्कळीत

| नेरळ | प्रतिनिधी |

मध्य रेल्वेच्या मेन लाईन वरील मुंबई कर्जत मार्गावरील नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकापुढील कर्जत दिशेकडे असलेले रेल्वे फाटक तेथून वाहतूक करणार्‍या टेम्पो चालकाने तोडले. त्यानंतर त्या फाटकातून होणारी वाहनांची वाहतूक तब्बल अडीच तास बंद होती. दरम्यान, मध्य रेल्वेकडून त्या टेम्पो चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला असून, रेल्वे फाटकाला धडक देणारा टेम्पो रेल्वे सुरक्षा दलाच्या ताब्यात आहे.


नेरळ रेल्वे स्थानकाच्या पुढे गेट नंबर 27 हे फाटक आहे. हे फाटक नेरळ पूर्व आणि पश्‍चिम भाग जोडणारे महत्वाचे फाटक आहे. त्यावेळी दिवसभर या फाटकातून वाहनांची वर्दळ सुरु असते. मंगळवारी (दि.27) दुपारी एक वाजता नेरळ पूर्व भागातून नेरळ बाजार पेठ मध्ये एक टेम्पो फाटक ओलांडून जात होता. एमएच-05-आर-8001 या क्रमांकाचा टेम्पो भंगाराच्या साहित्य घेऊन जात होता. मात्र त्या टेम्पोवरील लोखंडी साहित्य हे रेल्वे फाटकाच्या लोखंडी खांबाला धडकले आणि त्यामुळे रेल्वे फाटक अर्धवट मोडून पडले. त्याचा परिणाम त्या ठिकाणी रेल्वे फाटक यांचे ऑपरेशन करून तेथील ‘बी’ केबिन मध्ये बसणार्‍या रेल्वे कामगाराला शक्य नव्हते. त्यामुळे त्या फाटकातून होणारी वाहतूक दुपारी एक वाजता बंद पडली.

त्यानंतर नेरळ रेल्वे स्थानकात असलेले आरपीएफ जवान यांनी फटकळ धडक देणारा टेम्पो ताब्यात घेतला. चालकावर गुन्हा दाखल केला असून या प्रकाराने नेरळ पाडा येथे फाटक क्रमांक 27 हे तब्बल अडीच तास बंद होते. दुपारी साडे तीन वाजता ते फाटक सुरु झाल्यानंतर वाहन चालक यांनी नेरळ पूर्व ते नेरळ पश्‍चिम अशी वाहतूक पुन्हा सुरु झाली. मात्र फाटक बंद असल्याने वाहन चालक यांना कर्जत येथे जाण्यासाठी नेरळ पूर्व भागातील वाहन चालक यांना आंबिवली येथील फाटक 28 आणि दामत येथील फाटक 26 येथून प्रवास करावा लागला. मात्र त्यासाठी चार ते पाच किलोमीटर अंतर अधिक प्रवास करावा लागला. त्यामुळे इंधनाची बचत होऊ शकली नाही याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी सूचना वाहनचालक करीत आहेत. तर या प्रकरणात फाटक तोडणार्‍या टेम्पो सध्या रेल्वे सुरक्षा दलाच्या ताब्यात आहे.

Exit mobile version